केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. जळगावनंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये त्यांची सभा पार पडली. त्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे असे दिग्गज नेते उपस्थित होते. तसंच लोकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी एक वाक्य म्हटलं. अमित शाह स्टेजवर असतानाच ते वाक्य त्या बोलून गेल्या. ज्याची चर्चा आता रंगली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

“महाराष्ट्र ज्यांच्या त्यागाने, स्वाभिमानी बाण्याने पावन झाला ते नाव म्हणजे छत्रपती संभाजी. हे नाव देण्यात आणि देशाला स्वाभिमान देण्यात मोठं योगदान दिलं, तसंच कलम ३७० रद्द केलं त्या अमित शाह यांचं मी स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे ३७० कलम रद्द करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामागे अपार मेहनत होती ती अमित शाह यांची.” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन इतकंच सांगते..

आज अमित शाह यांचं छत्रपती संभाजी नगरमध्ये येणं हे अजून ताकदीने मैदानात उतरण्यासाठीचं द्योतक आहे असं म्हणायला हरकत नाही. मी फार वेळ इथे घेणार नाही. पण एक सांगते, जिंदगी के रंगमंच पर कुछ इस तरह निभाया अपना किरदार, परदा गिर चुका है तालियाँ फिर भी गुंज रही है असं काम ज्यांनी केलं त्या माझ्या पित्याच्या चरणी नतमस्तक होऊन इतकंच सांगते या देशाला जेव्हा सर्वात जास्त गरज होती की, गरिबांच्या स्वप्नांना ठिगळ लावण्याची, एका गरिबाला खुल्या आसमानातून स्वत:च्या पक्क्या घरामध्ये पोहोचवण्याची, माता-बहिणीच्या डोळ्यातलं पाणी नळामध्ये आणण्याचं तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाला लाभले आहेत. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.

हे पण वाचा- “गोपीनाथ मुंडेंची बॅग घेऊन फिरणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांचं..”, सुषमा अंधारेंचा आरोप

प्रभू रामाचं मंदिर झालं

“अनेक वर्ष ज्या फाटक्या टेंटमध्ये प्रभू श्रीरामांचं वास्तव्य होतं त्यांना मंदिरात नेण्यामध्ये यश आलं आहे तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, विश्वास ठेवून रामराज्याकडे डोळ्यामध्ये आशा लावून प्रतिक्षा पाहणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला असं वाटलं पाहिजे की, रामराज्य आलं पाहिजे हे दायित्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वजण कामाला लागले आहेत. एक मोठा यज्ञ सुरु झाला आहे. या यज्ञामध्ये सर्वांनी आपल्या प्रयत्नांची आहुती द्यायची आहे”, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यांचं गोपीनाथ मुंडेंबाबत उच्चारलेलं वाक्य चर्चेत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parda gir chuka hai bjp pankaja munde leader pankaja munde speech in front of amit shah scj