रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणा-या निवडणुकांआधीत सत्ताधारी मित्र पक्ष शिवसेना व भाजपामध्ये चुरस सुरु झाली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे हे रत्नागिरी जिल्हा दौ-यावर असताना हा पक्ष प्रवेश झाल्याने दोन्ही मित्र पक्षातील कुरघोडी पुन्हा पहावयास मिळत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील ठाकरेच्या शिवसेनेतील कार्यकर्ते फोडण्याचे काम शिंदेच्या शिवसेनेकडून करण्यात आले. मात्र आता भाजपा कडून शिवसेनेचे कार्यकर्ते फोडण्यास सुरुवात झाली आहे. रत्नागिरीत मित्र पक्षानेच मित्र पक्षाचे कार्यकर्ते फोडल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाचणे ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्य, शाखाप्रमुखांनाच फोडण्याचे काम भाजपाने केले. यावेळी मोठ्या प्रमाणात महिला वर्गाने देखील भाजपमध्ये प्रवेश केला. मागील दोन दिवसापूर्वी पालकमंत्री उदय सामंत आणि मंत्री नीतेश राणे यांच्या कार्यकर्त्यां मध्येच पक्ष प्रवेशाबद्दल वादावादी झाली होती. या पार्श्वभूमीवर मंत्री नीतेश राणे यांनी नाचणे जिल्हा परिषद गटावर लक्ष घालत नाचणे येथील कार्यकर्ते व महिलाचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थिती मध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला.
भाजपात पक्ष प्रवेश करणारे कार्यकर्ते आमचे नव्हते. ते सर्व ठाकरे गटाचे होते. आम्ही त्यांना शिवसेना शिंदे गटात येण्याविषयी विचारले होते. मात्र त्यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला. – राहुल पंडीत, जिल्हाप्रमुख, रत्नागिरी शिवसेना शिंदे गट.