Phaltan Women Doctor Death Case : साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या महिला डॉक्टरने स्वत:चं जीवन संपवण्यापूर्वी तळहातावर सुसाइड नोट लिहिली होती. त्यामध्ये दोन जणांवर गंभीर आरोप केले होते.

दरम्यान, या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणात मोठी अपडेट समोर आली असून या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पीएसआय पोलिसांना शरण आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी शनिवारी संशयित आरोपी प्रशांत बनकरला अटक केली होती, त्यानंतर शनिवारी रात्री उशिरा मुख्य संशयित आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने हा पोलिसांना शरण आला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलं असून या प्रकरणातील ही दुसरी अटक आहे. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थने दिलं आहे.

मुख्य संशयित आरोपी निलंबित पीएसआय बदने जेव्हा पोलीस ठाण्यात शरण आला तेव्हा पोलीस ठाण्यासमोर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांनी काय म्हटलं?

फलटण येथील उपजिल्हारुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून विरोधकांकडून सत्ताधारी पक्षांवर आरोप केले जात आहेत. यादरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. तरूण डॉक्टरचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत. याबरोबरच त्यांनी अशा संवेदनशील विषयाचे राजकारण करणे अत्यंत असंवेदनशील असल्याचेही म्हटले आहे.

या प्रकरणावर माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खूपच गंभीर प्रकरण आहे. कारण एक तरूण डॉक्टर स्वत:च्या हातावर आपल्या मनातील वेदना लिहून आत्महत्या करते ही आमच्यासाठी एक दु:खद गोष्ट आहे. त्यामुळे सरकारने कालच जो संबंधित पोलीस अधिकारी आहे, त्याला निलंबित केले आहे. अटक करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. जे कोणी सहभागी असतील त्यांना कठोरता कोठोर शिक्षा दिली जाईल.”