संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मीक कराडचा एन्काउंटर करण्याचा कट रचल्याचा थेट मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरच आरोप करणारी चित्रफीत समाजमाध्यमातून प्रसारित करत राज्यभर खळबळ उडवून देणारे बीड येथील सायबर पोलीस ठाण्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित गंगाधर कासले याला शुक्रवारी पुण्यात अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांना दुपारी बीडमध्ये आणण्यात आले. त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी दिली.

दरम्यान तत्पूर्वी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी कासले याला गुरुवारी सेवेतून बडतर्फ केले. शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त होते. त्याच्या पूर्वसंध्येलाच कासलेवरील बडतर्फीचे आदेश काढण्यात आले आले. बडतर्फीची माहिती बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शुक्रवारी देण्यात आली.

बडतर्फ केल्यासंदर्भातील पत्रात म्हटले आहे, की कासले यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी गुजरातमध्ये गेले असता तेथील आरोपीस सोडून दिल्याची एक चित्रफीत प्राप्त झाली. त्याची सत्यता पडताळण्यात आली. कासले यांनी माहिती-तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देऊन पैशांची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांच्यावर २३ मार्च रोजी निलंबनाची कारवाई करण्यात आली.

त्यानंतरच्या प्राथमिक चौकशीसाठी कासले यांना वेळोवेळी बोलावण्यात आले; परंतु ते आले नाहीत. कासले यांनी निलंबनाविरुद्ध कायदेशीर अपील करणे अपेक्षित असताना, त्यांनी झालेल्या कारवाईस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच महाराष्ट्र सरकारमधील इतर मंत्री, बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार व पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी यांच्याविषयी चुकीचे, बेताल वक्तव्ये केली. तसेच याची चित्रफीत तयार करून समाजमाध्यमावर प्रसारित केली. तसेच विविध वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून चुकीच्या, तसेच आधारहीन बाबींचा उल्लेख करून मुलाखती दिल्या. निलंबन कालावधीत जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य केल्याने विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी ॲड. भगवान वसंत कांडेकर यांच्या तक्रारीवरून कासलेंवर बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

कासले बोलले, त्याची चौकशी व्हावी

उपनिरीक्षक कासले यांनी जे जे विधान केले, त्याची रीतसर चाैकशीची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. नाशिक येथील उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या निलोफर शेख यांचे नाव तेथील दंगल प्रकरणात पुढे आल्यानंतरच्या प्रश्नावर दानवे यांनी सर्वच दंगलींची चौकशी करावी, अशी मागणी केली. सोबतच उपनिरीक्षक रणजित कासले यांच्याबाबतही वरील मागणी केली.