सोलापूर : सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेमध्ये बोलताना ‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे केंद्र सरकारने केलेला ‘तमाशा’ आहे, असे वक्तव्य केल्याचा निषेध होत आहे. दरम्यान याच्या निषेधार्थ सोलापुरात भाजपने गाढव आणून आंदोलन केल्याबद्दल काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत भाजपवरोधात आंदोलन केले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी याबद्दल भाजपकडून आंदोलनाचे नेतृत्व करणारे आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर टीकास्त्र सोडले. कोठे यांनी स्वतःचा इतिहास काढायला भाग पाडू नये. तो काढल्यावर त्यांच्या अंगलट येईल, अशा शब्दांत नरोटे यांनी त्यांना इशारा दिला. काँग्रेस भवनासमोर झालेल्या या आंदोलनाप्रसंगी पोलिसांनी लगेचच धावत येऊन हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी आंदोलक कार्यकर्त्यांची बाचाबाची केली. दरम्यान, खासदार प्रणिती शिंदे यांनी, ‘ऑपरेशन सिंदूरच्या नावाने केलेल्या तमाशा ’ या आपल्या विधानाबद्दल माफी मागणार नसल्याचे सांगितले.