अहिल्यानगर: पुणे येथील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टची जागा आणि जैन मंदिराची बेकायदा विक्री करण्यात आली, हे खरेदीखत रद्द करावे, तसेच संबंधितांवर कारवाई करावी या मागणीसाठी नगरमधील सकल जैन समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

कापड बाजारातील जैन मंदिरापासून मोर्चास सुरुवात झाली. डाळ मंडई, आडते बाजार, धरती चौकमार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. नरेंद्र फिरोदिया, वसंत लोढा, नरेंद्र लोहाडे, नरेश गुगळे, किशोर मुनोत, अनिल पोखरणा, संतोष गांधी, बाबूशेठ बोरा, शैलेश मुनोत, अशोक पितळे, सुमतीलाल कोठारी, संजय चोपडा, अजय मुथा, संजय महाजन, सचिन कटारीया, महावीर गोसावी, कुणाल बडजाते, राजेंद्र बलदोटा, अजित कर्नावट, मनोज गुंदेचा, किरण काळे, भगवान फुलसौंदर, संभाजी कदम, विक्रम राठोड, अजय गंगवाल, कुणाल भंडारी, महावीर बडजाते, शिरीष बेगडे, अमित मुथा, अजय बोरा, रणधीर लोखंडे, सरोज कटारिया, रचना चुडीवाल, आरती लोहाडे, सारिका बडजाते, सौरवी धोंगडे आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले.

मोर्चामध्ये जैन ओसवाल पंचायत बडीसाजन, श्री संघ, दिगंबर जैन समाज, श्री ऋषभ संभव जैन, श्वेतांबर संघ, श्वेतांबर जैन गुजराती समाज, अ. भा. जैन ओसवाल संस्था, श्री वर्धमान जैन श्रावक संघ, धार्मिक परीक्षा बोर्ड, जैन ओसवाल युवक संघ, बडीसाजन युवक संघ, जैन सोशल फेडरेशन, वर्धमान युवा संघ, धर्मचक्र युवक मंडळ, जय आनंद युवक फाउंडेशन, महावीर चषक परिवार, महावीर प्रतिष्ठान, जितो, जय आनंद महावीर युवक मंडळ आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

पुणे येथील व्यवहाराचे बनवलेले बोगस खरेदीखत रद्दबातल करावे, प्रतिष्ठित जैन मंदिर विक्री करून गहाण टाकत त्याचे पावित्र्य धोक्यात आणले गेले. या सर्व प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करावा, परिस्थिती आहे त्या स्थितीत राखण्यासाठी विशेष अधिकाराद्वारे मुख्यमंत्री व पंतप्रधानांपर्यंत पोहोचवावी आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. या सर्व प्रकारामुळे जैन बांधव अक्रोशीत असून, हा जैन धर्मावर घाला आहे. कोणत्याही प्रकारे शहानिशा न करता राजकीय पाठबळ व दबाव तंत्राचा वापर करून परवानगी मिळवण्यात आली. त्यामुळे हे खरेदीखत रद्द करावे, अशीही मागणी सकल जैन समाजाच्या निवेदनात करण्यात आली आहे.