अलिबाग: रायगड जिल्ह्यात दिड महिन्यात एकूण सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. मे आणि जून महिन्यात चांगला पाऊस झाला असला तरी जुलै महिन्यातील पहिले १५ दिवस कोरडे गेले आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

रायगड जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात सरासरी ३ हजार १४८ मिलीमीटर पाऊस पडतो. यंदा १४ जुलै पर्यंत जिल्ह्यात सरासरी ९५६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत सरसरी ३० टक्केच पाऊस पडला आहे. शेती आणि शेतकऱ्यांसाठी ही एक चिंतेची बाब आहे.

जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली होती. रायगड जिल्ह्याचे जून महिन्याचे सरासरी पर्जन्यमान हे ६५५ मिलीमीटर असते, त्या तुलनेत यावर्षी ६९७ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरीच्या तुलनेत १०६ टक्के पाऊस पडला होता. पण जुलै महिन्यात परिस्थिती पावसाने चांगलीच ओढ दिली. जो महिना सर्वाधिक पावसाचा महिना म्हणून ओळखला जातो, त्या जुलै महिन्यात यावर्षी पहिले पंधरा दिवस फारसा पाऊसच पडला नाही. ५४४ मिमी पाऊस होणे अपेक्षित असतांना जिल्ह्यात २५९ मिमीपावसाची नोंद झाली आहे. म्हणजेच जुलै मधील सरासरीच्या तुलनेत ४७ टक्के पाऊस पडला पडला आहे.

अपेक्षित पाऊस पडत नसल्याने, शेतीची कामे खोळंबली आहेत. लावणीची कामे रखडल्याने, शेतकरी चिंतातूर आहेत. सोमवार पासून पावसाला पुन्हा एकदा सुरवात झाली आहे. पावसाचा जोर पुढील चार पाच दिवस कायम राहिला तर भात लावणीची कामे मार्गी लागू शकणार आहेत.

वार्षिक पर्जन्यमानाच्या तुलनेत पावसाची तालुका निहाय टक्केवारी

अलिबाग ३८ , मरुड ३० , पेण ३९ , पनवेल ३४ , उरण ४७ , कर्जत ३० , खालापूर ३६ , सुधागड ३२ , माणगाव २८ , तळा २९ , महाड २८ , पोलादपूर २४ , श्रीवर्धन २६, म्हसळा ३२, तर रोहा येथे ३४ टक्के पाऊस पडला आहे.

पर्जन्यमान कमी असले तरी धरणांच्या पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे. लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या २८ प्रकल्पांपैकी २१ प्रकल्प पूर्ण भरली आहेत. तीन लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये ७५ टक्के होऊन अधिक पाणीसाठा झाला आहे. उर्वरित चार प्रकल्पा पैकी दोन धरणांमध्ये पन्नास टक्केहून अधिक पाणीसाठा आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी असले तरी रायगडकरांची जलचिंता मिटली आहे.

पावसाअभावी भात लावण्या रखडल्या

जिल्ह्यात पुरेसा पाऊस पडत नसल्याने भात लावण्याची काम रखडली आहेत. जिल्ह्यात ९० हजार हेक्टर लागवडीखालील क्षेत्र असून यापैकी केवळ २० टक्के क्षेत्रावर लावणी पूर्ण झाली आहे. उर्वरित ठिकाणी शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.