अलिबाग: रायगड मतदार संघासाठी येत्या ७ मे ला मतदान होणार आहे. यासाठी १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. यात उच्च शिक्षित उमेदवारांसोबतच अल्प शिक्षीत उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात आहेत. केंद्रीय मंत्रीपदाची दोन वेळा धुरा संभाळणारे गीते यांनी दापोली येथील ए. जी माध्यमिक शाळेतून दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत. राज्यमंत्री मंडळात यापूर्वी त्यांनी अनेक मंत्री पदांवर काम केले आहे. त्यांनी अलिबाग येथील जेएसएम महाविद्यालयातून पी.डी. सायन्स पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वंचित बहुजन आघाडीकडून कुमूदीनी चव्हाण निवडणूक लढवत आहेत. व्यवसायाने मुख्याध्यापिका असलेल्या कुमूदीनी यांनी भारती विद्यापिठातून एम.फील. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असून पिएचडी करत असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे. भारतीय जवान किसान पार्टीच्या माध्यमातून कर्नल प्रकाशराव चव्हाण निवडणूक लढवत आहेत. निवृत्त सैन्यदल अधिकारी असलेल्या चव्हाण यांनी एमबीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

हेही वाचा : ‘कऱ्हाडेनं घेतलेली चंद्रकांत पाटलांची भयाण मुलाखत पूर्ण पाहा’, किरण मानेंकडून १५ लाखांची ऑफर

आम आदमी पार्टीचे अलिबाग तालुका अध्यक्ष असलेल्या अजय उपाध्ये यांनी अपक्ष निवडणूक अर्ज दाखल केला आहे. व्यवसायाने वकील असलेले उपाध्ये यांनी बी.ए. एलएलबी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. या शिवाय पशुवैद्यकीय आणि इंजिनिअरींग या दोन क्षेत्रात त्यांनी डिप्लोमा पर्यंत शिक्षण घेतले आहे.

शेती व्यवसाय असलेले अनंत पद्मा गिते हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी म्हसळा येथील काळसुरी को. ए. सो. शाळेतून आठवी पर्यंत शिक्षण घेतले आहे. तर अनंत बाळोजी गिते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यांनी देखील म्हसळा येथील काळसुरी येथील को.ए.सो. शाळेतून नववी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. अमित श्रीपाल कवाडे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठातून बी.ए. पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. नोकरी करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अंजनी अश्विन केळकर या एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. नोकरी व्यवसाय असलेल्या केळकर यांनी अलिबाग, हाशिवरे येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. मंगेश पद्माकर कोळी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. मासेविक्री हा त्यांचा व्यवसाय असून त्यांनी पेण येथून दहावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कोळी समाजाचे दामोदर पांडूरंग चौले हे देखील अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यांनीही दहावी पर्यंत शिक्षण घेतले आहे. नितिन जगन्नाथ मयेकर अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांनी विज्ञान शाखेतील पदवीचे व्दितीय वर्षापर्यंत शिक्षण घेतले आहे. श्रीनिवास मट्टरपती यांनी नेहमी प्रमाणे अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यांनी अकरावी पर्यंत शिक्षण घेतले असून ते व्यवसायिक आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान मोदींच्या कोल्हापूरच्या सभेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल; म्हणाले, “शाहू महाराज छत्रपती यांचा…”

एकूणच मतदारसंघात अल्पशिक्षीत उमेदवारांबरोबरच उच्च शिक्षित उमेदवार यंदा निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूकीच्या राजकारणात मतदारांकडून उमेदवारांची शैक्षणिक आर्हता फारशी लक्षात घेतली जात नसली तरी निवडणूक आयोगाच्या निर्देशामुळे प्रत्येक उमेदवाराला आपली शैक्षणिक पात्रता जाहीर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.