अलिबाग – म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षासह आणि नऊ नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. खासदार सुनील तटकरे आणि महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
नगरपालिका निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. मंगळवारी घडलेल्या एका नाट्यमय घडामोडी शिवसेना शिंदे गटाने महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यातील म्हसळा नगरपंचायतीला सुरूंग लावल्याने खळबळ उडाली आहे.
म्हसळा नगरपंचायत येथील नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत आणि एकूण नऊ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
नगरपंचायतीचे आरोग्य सभापती सोमय्या कासिम आमदानी पर्यटन समिती सभापती राखी अजय करंबे, यांच्या सह अस्सल असलम कादरी, सईद जंजीरकर जबीन नदीम दळवी, कमल रवींद्र जाधव, सारा अब्दुल कादरी, सुफियान इकबाल हळदे, नसीर अब्दुल रहीमान मिठागरे हे नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात दहा नगरपालिकासाठी निवडणूक होत आहे. या निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस कडून शिवसेना शिंदे गटाची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू होते. महाड, मुरुड जंजिरा येथील नगरपालिका निवडणूकीत शिवसेना शिंदे गटाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप एकत्रितपणे निवडणूकीत उतरले होते.
तर कर्जत खोपोली मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटासोबत हातमिळवणी केली होती. शिवसेना शिंदे गटाच्या अडचणी वाढण्याची चिन्ह होती. मात्दिर म्हसळा नगर पंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक फोडून शिवसेना शिंदे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का दिला आहे.
