अलिबाग : अलिबाग आणि मुरुड तालुक्यातील पर्यटन स्थळी अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी रायगड पोलीसांनी जेरबंद केली आहे. या प्रकरणी तब्बल १३ जणांना अटक करण्यात आली असून, पूढील तपास सुरू आहे, अशी माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली.
अलिबाग मुरुड मध्ये येणाऱ्या पर्यटकांना तसेच स्थानिक तरुणांना चरस पुरवठा करण्याचे काम या टोळीच्या माध्यमातून केले जात होते. उत्तर प्रदेशमधील पोखरभिंडा येथे राहणारा विशाल जैसवाल हा टोळी चालवत होता. नेपाळमधून चरस आणून अलिबाग, मुरुड मध्ये स्थानिक साथीदारांना चरस विक्रीसाठी देत होता. स्थानिक दुकानदार, बीचवरील घोडेवाला, आयस्क्रीम विक्रेता अशा वेगवेगळ्या घटकात काम करणाऱ्या लोकांच्या माध्यमातून त्याने स्वतःची टोळी निर्माण केली होती. पर्यटकांना आणि स्थानिक तरुणांना अंमली पदार्थांचा मागणीनुसार ही टोळी पुरवठा करत होती.
मुरुड तालुक्यात नाका बंदी दरम्यान शिघ्रे पोस्ट वर सुरु असलेल्या वाहन तपासणीत, अलवान निसार दफेदार- या १९ वर्षीय तरुणाकडे गाडीच्या डिकीत ७७६ ग्रॅम चरस आढळून आले. यानंतर पोलींसांनी त्याला ताब्यात घेऊन तपासाला सुरूवात केली. यानंतर या अंमली पदार्थ तस्करी टोळीचा पर्दाफाश झाला. पोलीसांनी आत्ता पर्यंत एकूण १३ जणांना अटक केली आहे. यात अलवान निसार दफेदार, विशाल रामकिशन जैसवाल, अनुप राजेश जैसवाल, अनुज विनोद जैसवाल, आशिष अविनाश डिगे, प्रणित पांडूरंग शिगवण, आनस इम्तियाज कबले, वेदांत विलास पाटील, साहील दिलदार नाडकर, अनिल बंडू पाटील, सुनिल बुधोजी शेलार, राजु खोपटकर, खुबी मखनसिंग भगेल या तेरा जणांचा यात समावेश आहे.
त्यांच्याकडून एकूण १३ लाख ६१ हजार रुपये किमतीचे २ किलो ६५९ ग्रॅम चरस जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील आणखिन एका आरोपीचा शोध सुरू आहे. या तपासात अप्पर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, पोलीस उप निरीक्षक अविनाश पाटील, पोलीस हवालदार जनार्दन गदमले, हरी मेंगाल, पोलीस नाईक किशोर बठारे, पोलीस शिपाई अतुल बरवे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
जिल्ह्यात आणि पोलीस दलातही अंमली पदार्थ विरोधात झिरो टॉलरन्स पॉलिसी राबवणार आहोत. अंमली पदार्थ तस्करी वितरणात जे कोणी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ तस्करीचे प्रकार समोर येतील, तेथील पोलीस अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशीला सामोरे जावे लागेल. – आंचल दलाल, पोलीस अधीक्षक, रायगड.
मुख्य सुत्रधाराला नेपाळ आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक
या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार आधी उत्तर प्रदेश आणि नंतर नेपाळ येथे पळून गेला होता. त्यामुळे त्याला ताब्यात घेणे पोलीसांसाठी आव्हानात्मक ठरत होते. पोलीसांनी आधी उत्तर प्रदेश आणि नंतर नेपाळ पोलीसांची मदत घेऊन विशाल जैसवाल याला ताब्यात घेतले.