Raj Thackeray and Uddhav Thackeray : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. यातच काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्यांवरून मुंबईत एकत्र येत मेळावा घेतला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर आज (२७ जुलै) सकाळी राज ठाकरे हे मातोश्रीवर दाखल झाले आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास २० मिनिटांपेक्षा जास्त चर्चा झाल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे आता येत्या काळात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
उद्धव ठाकरेंनी काय प्रतिक्रिया दिली?
दरम्यान, राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पाऊल ठेवताच उद्धव ठाकरे यांना आनंद झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवरील भेट ही बाळासाहेबांच्या फोटोसमोर झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी दोन्ही बंधूंची गळाभेटही झाली. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मनोमिलन झाल्याचं बोललं जात आहे.
मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे ह्यांच्याकडून वाढदिवसानिमित्त पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना शुभेच्छा! pic.twitter.com/86xQrkk800
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 27, 2025
राज ठाकरे यांनी मातोश्रीवर येऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अगदी दोन शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, “आज मला खूप आनंद झाला आहे.” दरम्यान, या भेटीवेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांच्यासह आदी नेतेही उपस्थित होते.
पक्षप्रमुख मा.श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांना वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्मा.राजसाहेब ठाकरे ह्यांनी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/yUMly9g7x4
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) July 27, 2025
संजय राऊत काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेना (ठाकरे) आणि मनसेच्या काही नेत्यांचा समावेश आहे. संजय राऊत यांनी म्हटलं की, “सगळे एकत्र! काहीच अडचण नाही!”
सगळे एकत्र!
— Sanjay Raut (@rautsanjay61) July 27, 2025
काहीच अडचण नाही! pic.twitter.com/MYCMRopzqz
उद्धव ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना दिले होते युतीचे संकेत
मुंबईत झालेल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, “राजने भाषणाच्या सुरुवातीला माझा उल्लेख सन्माननीय असा केला. त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलं आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची सुरुवात सन्माननीय राज ठाकरे अशीच करत आहे. राजने त्याच्या भाषणात मराठीचा मुद्दा व हिंदीच्या सक्तीबाबत अप्रतिम मांडणी केली आहे. त्यामुळे माझ्या भाषणाची आवश्यकता वाटत नाही. वैयक्तिक मला वाटतं की आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं आहे. आमच्या दोघांमधील अंतरपाठ अण्णाजीपंतांनी दूर केला आहे. आता तुमच्याकडून अक्षता टाकण्याची अपेक्षा नाही. आम्ही दोघे एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.