मागील काही दिवसांपासून राजकीय नेते एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करताना दिसत आहेत. ही टाका करताना अनेक नेतेमंडळी शिवराळ भाषेचाही वापर करत आहेत. याच मुद्द्यावर बोलताना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय नेत्यांवर खरपूस शब्दांत टीका केली आहे. अभद्र आणि शिवराळ भाषेचा वापर करणाऱ्या नेत्यांना वृत्तवाहिन्यांनी स्थान देणे बंद करावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले. ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीने आयोजित केलेल्या ‘माझा व्हिजन’ या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> “मविआ सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव, संजय पांडेंना टार्गेटच..” देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

“मागील दहा वर्षांत अनेक मुख्यमंत्री झाले. बऱ्याच लोकांचे सरकार आले आणि गेले. मागील दहा वर्षांतील व्हिजनचे काय झाले, हे मला विचारायचे आहे. आता जे सत्तेत आहेत किंवा जे सत्तेत होते त्यांना माझ्या समोर आणा. मी त्यांना प्रश्न विचारतो. महाराष्ट्राचा बकालपणा आणि चिखल झालेला आहे. सध्या राजकारणात बोलली जाणारी भाषा योग्य नाही. सर्व वृत्त वाहिन्यांनीअशा भाषेत बोलणाऱ्यांवर बंदी घातली तर त्यांची बोलायची हिंमत होणार नाही,” असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीने काय परिणाम होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“मी राजकारणात येण्याअगोदर व्यंगचित्रकार होतो. जेव्हा राजकारणात आलो तेव्हापासून मी बघतोय की आपण त्याच त्याच समस्यांवर बोलत आहोत. आम्ही पाण्याचा, रस्त्याचा, शाळेचा प्रश्न सोडवू असे सुरुवातीपासूनच आश्वासन दिले जात आहे. मग अजूनही तेच प्रश्न का आहेत. आपण सतत पैसा ओतत आहोत. शहरं वाढत आहेत. शहराला कसलाही आकार राहिलेला नाही. शिक्षणाचेही तेच हाल आहेत,” असे मत राज ठाकरे यांनी मांडले.

हेही वाचा >>> अँटिलिया स्फोटके प्रकरण : प्रदीप शर्मा यांना जामीनास नकार; एनआयएच्या तपासावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

“आपल्याला आपल्या गरजाच समजलेल्या नाहीत. आपण बेसुमार खर्च करत सुटलो आहोत. आपल्याला फक्त विकास दाखवायचा आहे. पूल बांधणे, मेट्रो आणणे याने प्रश्न सुटणार नाही. आपण मूळ विषयाला हातच घालत नाहीत. सध्या ट्रॅफिकचा मुद्दा आहे. मग वाहनांवर बंदी कधी येणार. मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या शहरांत एखादा अग्निशामक दलाचा बंबदेखील जाऊ शकत नाही. हा प्रश्न कसा सोडवायचा. नुसती ऑटोमोबाईल इंडस्ट्री वाढत आहे. गाड्या विकल्या जात आहेत. पण त्या कुठे पार्क होत आहेत, याची आपल्याला माहिती नाही. गाड्या वाढत आहेत म्हणून आपण पूल, रस्ते बांधत आहोत. याने मूळ प्रश्न सुटणारच नाही. शहरांवर येणाऱ्या तणावाचा आपण विचार करणार आहोत की नाही. एका शहराची चार चार शहरं होत चालली आहेत. कोण कोठे राहतोय समजत नाहीये. कोण कोठे जातोय काहीही समजत नाहीये,” अशा भावना राज ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

हेही वाचा >>> “एक चट्टान, सौ शैतान” अंगावर काटा आणणारा अजय देवगणच्या ‘भोला’चा टीझर प्रदर्शित; तुम्ही पाहिलात का?

“राज्य कसे उभे राहिले पाहिजे, पाण्याचा प्रश्न कसा सुटला पाहिजे, रोजगार, शाळा यांचे प्रश्न सुटले पाहिजेत यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचा माणूस बोलवा. आम्हा राजकारण्यांना खाली बसवा आणि त्यांना बोलायला लावा. त्यानंतर जे सत्तेत आहेत त्यांना या सर्व बाबी कधीपर्यंत पूर्ण करणार आहात याबाबत विचारा,” असे राज ठाकरे माध्यमांना उद्देशून म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray demands ban on broadcasting politicians who use abusive language prd