scorecardresearch

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीने काय परिणाम होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. यावर फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

उद्धव ठाकरे-प्रकाश आंबेडकरांच्या युतीने काय परिणाम होणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व प्रकाश आंबेडकर (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही पक्षांच्या युतीची घोषणा केली. यानंतर शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र आल्याने राजकीय समीकरणं बदलतील असा अंदाज लावला जात आहे. अशातच या दोघांच्या युतीचा राज्याच्या राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर किती परिणाम होईल, असा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते मंगळवारी (२४ जानेवारी) एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “या युतीने फार परिणाम होईल, असं मला वाटत नाही. याचं कारण म्हणजे ही आघाडी केवळ भाजपाला विरोध म्हणून झाली आहे. अन्यथा प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना यांच्या विचारात खूप अंतर आहे. मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं होतं तेव्हा भाजपाने त्याला पाठिंबा दिला. मात्र, शिवसेनेने नामविस्ताराचा विरोध केला होता.”

“शिवसेनेने सर्व प्रकारचं आरक्षण रद्द करण्याची मागणी केली”

“मंडल आयोग आला तेव्हा भाजपाने आरक्षणाचं समर्थन केलं, मात्र शिवसेनेने त्याचा विरोध केला होता. सर्वच प्रकारचं आरक्षण रद्द करून ते आर्थिक निकषावर करावं अशाप्रकारची शिवसेनेची सातत्याने मागणी राहिली आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आरपीआयची आणि प्रकाश आंबेडकरांची जी भूमिका आहे त्याच्याविरोधात शिवसेनेची भूमिका आहे,” असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

“नामाविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकरांना जावं लागलं”

“अशा नामाविस्तार आणि आरक्षणविरोधी शिवसेनेबरोबर प्रकाश आंबेडकरांना जावं लागतं. याचा अर्थ भाजपाला पराभूत करण्यासाठी हे दोन्ही पक्ष कुठल्याही प्रकारची तडजोड करायला तयार आहे,” असा टोला फडणवीसांनी ठाकरे-आंबेडकरांना लगावला.

“प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक हरले”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “मला वाटतं जनतेला हे समजतं. प्रकाश आंबेडकर सातत्याने अकोल्यातून निवडणूक लढले आणि ते काही जिंकून येऊ शकले नाही. आता त्यांना असं वाटतं की शिवसेना बरोबर आली तर कदाचित हिंदुत्ववादी मतं आपल्याबरोबर येतील. मात्र, त्यांना माहिती नाही की, हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली आहे.”

हेही वाचा : VIDEO: “काही लोकांनी बेईमानी केली, त्यामुळे…”, फडणवीसांचं मोदींसमोर शिवसेनेतील बंडखोरीवर भाष्य, म्हणाले…

“हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली”

“हिंदुत्ववादी मतदारांनी शिवसेनेची साथ आधीच सोडली, कारण शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. त्यामुळे हिंदुत्ववादी मतं शिवसेनेबरोबर कशी राहतील? त्यामुळे या युतीमुळे फार परिणाम होईल असं वाटत नाही. त्यांनी युती केली आहे, तर निवडणुकीत त्याचा काय परिणाम होतो हे बघुयात,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-01-2023 at 12:41 IST

संबंधित बातम्या