“आमच्या पक्षात फूट पडली तेव्हा चिन्ह…”, आरपीआयचं उदाहरण देत शिवसेनेबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान

रामदास आठवले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर मोठं विधान केलंय.

“आमच्या पक्षात फूट पडली तेव्हा चिन्ह…”, आरपीआयचं उदाहरण देत शिवसेनेबाबत रामदास आठवलेंचं मोठं विधान
रामदास आठवले, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे

भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेतील बंडखोरी आणि पक्षाच्या ‘धनुष्यबाण’ या चिन्हावरून सुरू असलेल्या वादावर मोठं विधान केलंय. आठवलेंनी आरपीआय पक्षात फूट झाली त्याचं उदाहरण देत तेव्हा निवडणूक आयोगाने काय निर्णय दिला हे सांगितलं. तसेच त्याप्रमाणे आजच्या स्थितीत शिवसेना पक्षाचं चिन्ह उद्धव ठाकरे गटाला मिळणार की एकनाथ शिंदे गटाला याबाबत आपलं मत व्यक्त केलं. ते मंगळवारी (१६ ऑगस्ट) नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

रामदास आठवले म्हणाले, “खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच आहे. लवकरच याबाबत निवडणूक आयोगाकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. यापूर्वीचे निकाल पाहिले तसेच दिसतात. आमच्या पक्षात एकदा फूट पडली होती. आर. एस. गवई, जोगेंद्र कवाडे आणि मी असे तिघेजण एकत्र होतो. त्यावेळी कुणाला पाठिंबा द्यायचा यावरून आमच्यात वाद झाला. मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेलो आणि गवई व कवाडे काँग्रेससोबत गेले.”

“माझ्या बाजूने संपूर्ण पक्ष होता, तरी चिन्ह मिळालं नाही”

“आमचा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. त्यावेळी दोन खासदार गवईंच्या बाजूने असल्याने आमच्या पक्षाचं ‘उगवता सूर्य’ चिन्ह गवईंना मिळालं होतं. त्यावेळी माझ्या बाजूने संपूर्ण पक्ष होता, तरी आम्हाला ते चिन्ह मिळालं नव्हतं. आता शिवसेनेत २/३ पेक्षा अधिक आमदार व खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळे त्यांनाच धनुष्यबाण हे चिन्ह मिळेल,” असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “…तर ठाकरे सरकारला कुठेही तोंड दाखवायला जागा राहणार नाही”; रामदास आठवलेंचा हल्लाबोल

व्हिडीओ पाहा :

“धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क”

“उद्धव ठाकरे यांच्याकडे १५ आमदार आहेत. सहा खासदार आहेत. त्यामुळे त्यांनाही मान्यता मिळेल, मात्र दुसरं पक्षचिन्ह घ्यावं लागेल. धनुष्यबाणावर एकनाथ शिंदेंचाच हक्क आहे,” असंही आठवलेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘तुला संपवतो, घ्या रे याला’ म्हणत नितेश राणे आणि समर्थकांकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण, शासकीय अधिकाऱ्याची तक्रार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी