Ramdas Kadam on Yogesh Kadam: गेल्या दोन दिवसांपासून गृहराज्यमंत्री योगेश कदम व गुंड निलेश घायवळ यांच्याविषयी उलट-सुलट चर्चांना उधाण आलं आहे. निलेश घायवळला योगेश कदम यांनी मदत केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, योगेश कदम यांच्या मालकीचा डान्स बार असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणावर आता योगेश कदम यांचे वडील व शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. अनिल परब यांनी रामदास कदम यांच्यावर टीकास्र सोडल्यानंतर त्यावरून कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
विधानसभेतील न्यायाधीश व्यक्तीच्या सांगण्यावरून योगेश कदमने निर्णय घेतला – रामदास कदम
निलेश घायवळला योगेश कदम यांनीच शस्त्रपरवाना दिल्याचा आरोप अनिल परब व इतर विरोधी पक्षांनी केला आहे. त्यावरून रामदास कदम यांनी टीका केली आहे. “गेल्या अडीच वर्षापासून योगेश कदमला सातत्याने लक्ष्य केलं जात आहे. योगेश कदम निवडून आल्यामुळे यांचा पोटशूळ वाढला आहे. आत्तापर्यंत अनिल परबनी वेळोवेळी राजीनाम्याची मागणी केली. माझ्या पत्नीच्या लायसन्समध्ये ‘बार’ असा उल्लेख आहे, डान्सबार नाही. पण मुद्दाम महाराष्ट्रात आमची बदनामी होण्यासाठी लेकीबाळींना नाचवतायत आणि पैसा खातायत असे आरोप केले गेले. त्याला सरकारकडून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे”, असा आरोप रामदास कदम यांनी केला.
उद्धव ठाकरेंचा केला उल्लेख…
दरम्यान, यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले. “हॉटेल ड्रमबीट बार कुणाचा आहे? हे अनिल परबनं सांगावं. तो ठाकरे कुटुंबीयांचा आहे. तो आता बंद का झाला? त्याचा परवाना रद्द का झाला ते सांगावं. आम्ही आमच्या आयुष्यात कधी असले काळे धंदे केले नाहीत. आमच्या हॉटेलमध्ये १४ मुलींची वेट्रेस म्हणून परवानगी घेतली आहे, म्हणून त्या मुली तिथे होत्या. त्यातली एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती असं त्या दाखल गुन्ह्यात म्हटलंय. म्हणजे काय तो डान्सबार झाला का?” असा सवाल कदम यांनी केला आहे.
माझ्यासाठी तो विषय संपला – रामदास कदम
बाळासाहेबांच्या हातांच्या ठशांचा मुद्दा आपल्यासाठी संपल्याचं रामदास कदम म्हणाले. “बाळासाहेबांची बदनामी होईल असं कोणतंही विधान मला करायचं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचे ठसे आपण किल्ल्यावर घेतलेत. तसंच आमचे दैवत म्हणून बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले असतील तर वाईट काय आहे? यांना असं का वाटतं की मी ते स्विस बँकेसाठी बोललो म्हणून? बाळासाहेबांच्या बाबतीत असे घाणेरडे विचार आमच्या मनात कधीच येणार नाही. मी फक्त संशय व्यक्त केला होता. संपला विषय माझा. मला या विषयात खोलात जायचं नाहीये. बाळासाहेबांची बदनामी होईल असं कोणतंही विधान मला करायचं नाहीये”, असं रामदास कदम म्हणाले.
“…म्हणून योगेश कदमांनी ‘तो’ निर्णय घेतला”
“मीही गृहराज्यमंत्री होतो. त्यांना अधिकार असतात. त्याचं समाधान झालं की संबंधित व्यक्तीवर एकही केस नाही. एक शिक्षक असेल, एक बिल्डर असेल, न्यायालयाने क्लीनचिट दिली असेल तर गृहराज्यमंत्री निर्णय घेऊ शकतो. अनिल परबला विचारून तो निर्णय घेणार नाही”, असं रामदास कदम म्हणाले.
कुणाच्या सांगण्यावरून योगेश कदमांनी निर्णय घेतला?
शस्त्रपरवान्यासंदर्भात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी कुणाच्या सांगण्यावरून निर्णय घेतला, यावरही रामदास कदम यांनी मोठा दावा केला आहे. “योगेश कदमनं हा निर्णय विधानसभेतल्या एका मोठ्या पदावर बसलेल्या, मंत्र्यांनाही आदेश देणाऱ्या अशा एका व्यक्तीच्या सांगण्यावरून घेतला आहे. ती व्यक्तीही तिथली न्यायाधीशच आहे. त्यामुळे योगेश कदमनं हा निर्णय घेतला आहे. त्या व्यक्तीचं नाव योगेश कदमनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे. त्यांनी सांगितल्यानंतर आणि योगेश कदमचं संबंधित व्यक्तीबद्दल समाधान झाल्यानंतर निर्णय घेतला”, असं रामदास कदम म्हणाले आहेत.