Ramdas Kadam Vs Anil Parab Controversy : शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत एक मोठा दावा केला होता. बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या हातांचे ठसे घेण्यासाठी त्यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान, त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी आज (४ ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत रामदास कदम यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच रामदास कदमांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला.

दरम्यान, त्यानंतर आता अनिल परब यांच्या आरोपाला पुन्हा रामदास कदम यांनी उत्तर देत एक मोठा इशारा दिला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहाबाबत सीबीआय चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना मी पत्र लिहिणार असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नीबाबत केलेल्या आरोपांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे. ‘माझ्या पत्नीने स्वत:ला जाळून घेतलं नव्हतं, तर स्टोव्हचा भडका उडाला होता’, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“मला वाटतं अनिल परब हे अर्धवट वकील असावेत. अनिल परबांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या अज्ञानाचं प्रदर्शन केलं आहे. मी दसरा मेळाव्यात बोललो होतो, त्यामध्ये मी डॉक्टरांचा उल्लेख केला होता ते डॉक्टर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर उपचार करत होते. मग त्या डॉक्टरांवर देखील अनिल परब अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहेत का? पैशांसाठी, कारण त्यांच्याकडे आता पैसे कमी पडले असतील. मी आता निर्णय घेतला आहे की या प्रकरणात सरकारने सीबीआयची चौकशी करण्यात यावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार आहे”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

“बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस खरंच ठेवलं होतं का? याबाबत मी स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांना भेटून सीबीआय चौकशी करण्याची लेखी मागणी करणार आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. मग अनिल परबांनी न्यायालयात जावं. अनिल परबांना आपण काय बोलतो याचं भान असावं. आम्ही सर्व नेते मातोश्रीपासून लांब झालो आणि त्यानंतर ते मातोश्रीचे मालक झाले का? अन्यथा अनिल परब कोण होते? मला वाटतं बाळासाहेबांचं मृत्यू पत्र जे झालं, त्यामध्ये यांचाही काही संबंध असेल”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

‘चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्यात बकरा कापला का?’

अनिल परब साहेब चंद्रग्रहणाच्या रात्री कोळीवाड्याच्या स्मशानभूमीत आपण एक बकरा कापला का? कारण तुमच्या सारखाच एक माणूस होता असं बघणाऱ्यांचं म्हणणं आहे. तेव्हा बरोबर एक बिल्डर एक गाडी घेऊन आला होता आणि त्या गाडीत एक बकरा होता व दोन बाबा होते. त्या ठिकाणी माझं आणि योगेश कदम यांचं नाव घेऊन त्या बकऱ्याला कापलं असं त्यांना पाहणाऱ्यांचं म्हणणं आहे. मला नक्की माहिती नाही, पण जर हे वास्तव असेल तर हे चुकीचं आहे. याचाही अनिल परबांनी खुलासा करावा”, असं रामदास कदम यांनी म्हटलं.

“तुम्ही (अनिल परब) हे सर्व थांबवा, मी पक्षात नवीन नाही. मातोश्रीत ५० वर्ष काढलेली आहेत. तुम्ही किती वर्ष मातोश्रीत होता मला माहिती नाही. मी काल देखील सांगितलं होतं की हे चलेचपाटे माझ्याविरोधात काय पत्रकार परिषद घेत आहेत. उद्धव ठाकरेंना माझं खुलं आव्हान आहे की त्यांनी याबाबत बोलावं. अन्यथा मला या सर्व घटनेची चौकशी लावावी लागेल”, असा इशाराही रामदास कदम यांनी दिला.

‘माझ्या पत्नीबाबतच्या वक्तव्याबाबत परबांविरोधात कोर्टात जाणार’

“माझ्या पत्नीच्या संदर्भात अनिल परब जे बोलले आहेत. त्या विरोधात मी न्यायालयात जाणार आहे. हे कसे लोकं आहेत, एखाद्याच्या आईविरोधात किंवा पत्नीबाबत बदनामी करून राजकारण करतात. दोन स्टोव्ह होते, त्यामध्ये एका स्टोव्हमधून साडीला आग लागली आणि भडका उडाला. तेव्हा माझ्या पत्नीला मी वाचवलं. त्यानंतर सहा महिने माझ्या पत्नीवर उपचार सुरू होते. मात्र, याबाबत जे बदनाम केलं जात आहे ना त्याविरोधात आम्ही त्यांना कोर्टात खेचणार आहोत”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.