रत्नागिरी – माझ्याकडचे चार गेले तरी चाळीस तयार करण्याची धमक माझ्यात आहे. त्यांना भावनिक ब्लॅकमेलिंग करून पक्षात घेण्याचे काम शिंदेंच्या शिवसेनेने केले आहे. याला येत्या निवडणुकांमध्ये सडेतोड उत्तर दिले जाईल असा इशारा आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला आहे. ते म्हणाले, गुहागर मधील माझ्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यांना भावनिक करण्याचे काम कुणीतरी केले आहे. मात्र गेलेल्यांना मोठे करायचे काम आपण केले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये याचे परिणाम दिसून येतील, असे जाधव यांनी सांगितले.

शिंदे गटात गेलेले काही कार्यकर्ते आम्ही सत्तेसाठी व विकासासाठी गेलो असल्याचे सांगत आहेत. मात्र त्यांच्या मागे कोणीतरी चांगलाच माणूस असल्याचे आमदार जाधव यांनी स्पष्ट केले. ज्या लोकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे, त्यांना कोणतेही आरक्षण असताना देखील निवडणुकीचे तिकीट देऊन निवडून आणण्याचे काम आपण केले आहे. माझ्यामागे गुहागरची जनता उभी असून येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जोमाने कामाला लागून जास्तीत जास्त जागा निवडून आणणार असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.

मंत्री दादा भुसे यांच्या नातेवाईकांवर पडलेल्या ईडीच्या धाडी संदर्भात बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, आपण या गोष्टीचे स्वागत करत आहे. भाजपाने मित्र पक्षाला संपवण्याचे परंपरा कायम सुरू ठेवले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांच्या वर ईडीच्या धारी टाकून संपल्यानंतर आता भाजपाने मित्र पक्षाकडे मोर्चा वळवला आहे. मित्र पक्षाला संपवण्याचे काम भाजप सातत्याने करत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठेवलेल्या स्नेहभोजनाला शिवसेना शिंदे गटाचे मंत्री न गेल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना आमदार भास्कर जाधव यांनी त्यांचा श्रावण महिना सुरु असल्याचा मिश्किल टोला यावेळी लगावला. तसेच सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचे कारणामे बघता त्यांना पाठीशी घालण्याचे काम केले जात असल्याने सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल याबाबतची शक्यता खुपच कमी असल्याचे मतही आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद व्यक्त केले.