Ganeshotsav 2025 : रत्नागिरी– रत्नागिरी जिल्ह्यात गणेशाला मोठ्या भक्ती भावाने निरोप देण्यात आला. ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’ च्या नामघोषात आणि गुलाल उधळत गणेशाचे ठीक ठिकाणी विसर्जन करण्यात आले. बेंजो, ढोल ताशे वाद्यांच्या गजरात मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील घरगुती गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी २७ ऑगस्टला गणपतीचे आगमन झाले होते. त्यानंतर गेले सात दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात बाप्पांची पूजाअर्चा सुरू होती.

विसर्जनाच्या दिवशी सायंकाळी चार वाजल्या पासून गणेश मूर्ती वाजत गाजत विसर्जन स्थळी नेण्यास सुरुवात करण्यात आल्या. यावर्षी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १ लाख ६९ हजार ४२६ घरगुती गणपती तर १२६ सार्वजनिक गणेशोत्सावाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. जिल्ह्यात गणेशाला निरोप देण्याचा कार्यक्रम आणि विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. रत्नागिरी शहराजवळील मांडवी, भाट्ये, मी-या यासारख्या समुद्र किनारी गणेश भक्तांची मोठी गर्दी केल्याचे दिसून येत होते.

रत्नागिरी शहरात मंगळवार २ सप्टेंबर रोजी गौरी गणपती, ४ सप्टेंबर रोजी ९ दिवसांचे गणपती, ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी आणि ७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सार्वजनिक व खासगी गणेशमूर्तींचे मोठ्या संख्येने विसर्जन होणार असल्यामुळे रामनाका-राधाकृष्ण नाका- गोखले नाका- विठ्ठल मंदिर- काँग्रेस भवन या मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच रामनाका-तेलीआळी नाका- आठवडा बाजार चौक-भुते नाका-मत्स्यालय- मांडवी समुद्र किनारा या पर्यायी मार्गावर वाहतूक सुरु करण्यात आली. याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिध्द केली आहे. यावेळी मांडवी समुद्रकिनारी गणेशमूर्ती विसर्जन करणा-या प्रत्येक गणेश मूर्तीसहीत वाहने येत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते.

मांडवी समुद्र किनारी सार्वजनिक व खासगी गणपती मूर्ती वाहनातून विसर्जन करण्यासाठी रामनाका – राधाकृष्ण नाका – गोखलेनाका विठ्ठल मंदिर – काँग्रेस भवन या मार्गाने मांडवी समुद्र किनारी जातात. या मुदतीत मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ परिसरात भाविकांची व खरेदीदार यांची वर्दळ असल्याने जे भाविक गणपती विसर्जनाकरिता वाहने घेऊन येणार आहेत, त्यांच्याच वाहनांना आत प्रवेश देवून अन्य वाहनांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देण्याचे काम वाडी, वस्ती भागात मोठ्या उत्साहात करण्यात आले. रत्नागिरी शहरा बरोबर लांजा, राजापूर, चिपळूण, संगमेश्वर, खेड, दापोली, मंडणगड आणि गुहागर तालुक्याच्या ठिकाणी सूद्धा आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देण्यात आला.

जिल्ह्यातील बहूतांशी घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन नद्या, मोठे ओहोळ, प-या आदी ठिकाणी गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जन घाट ढोल ताशे यांच्या आवाजाने आणि गणेशभक्तांच्या मोठ्या उपस्थितीने फुलून गेला होता. जिल्ह्यात गणेश विसर्जन वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांची परतीसाठी लगबघ सुरु झाली. काही चाकरमान्यांनी गणेशाचे विसर्जन करुन परतीसाठी एसटी बस स्थानकावर, रेल्वे स्थानकावर आणि खाजगी वाहनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचे दिसून येत होते.