लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. यामध्ये कोल्हापूरच्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचाही मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. हातकणंगले मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकर अशी तिरंगी लढत झाली होती. या तिरंगी लढतीत धैर्यशील माने यांचा विजय झाला. लोकसभेत झालेल्या पराभवानंतर राजू शेट्टी यांनी ‘माझं काय चुकलं?’, अशा आशयाची एक भावनिक पोस्ट फेसबुकवर केली होती. आता रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर खोचक शब्दांत टीका करत हल्लाबोल केला. “राजू शेट्टींना प्रचंड अहंकार असून त्यांनी कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला केलं”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सदाभाऊ खोत काय म्हणाले?

“राजू शेट्टींमध्ये प्रचंड अहंकार आला होता. चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना खड्यासारखं बाजूला करायचं, त्यांना अपमानजनक वागणूक द्यायची. त्यांच्याविरोधात षडयंत्र रचायचं, बदनाम करायचं. कट कारस्थान करायचं, हे असं केल्यामुळे जीवाभावाचे लढणारे कार्यकर्ते त्यांच्यापासून लांब गेले. मी काय गुन्हा केला? असं ते म्हणाले, पण त्यांनी अनेक गुन्हे केले आहेत. आंदोलन करताना आम्ही प्रस्थापितांच्या विरोधात चळवळ उभा केली. मात्र, भारतीय जनता पक्षाबरोबर युती असताना स्वत:च्या स्वार्थासाठी युती तोडून प्रस्थापितांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यानंतर शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसले. नंतर बाजूला झाले. त्यानंतर स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची भूमिका घेतली”, असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं.

हेही वाचा : विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत बिघाडी? उद्धव ठाकरे म्हणाले, “काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी…”

ते पुढं म्हणाले, “निवडणुकीत पराभव दिसायला लागल्यानंतर मग सर्व पक्षाचे उंबरठे त्यांनी झिजवले, पण ते आता कबूल करणार नाहीत. अशा पद्धतीने स्वत:साठी पक्ष बदलायचा, युती करायची, म्हणजे जे काही असेल ते फक्त स्वत:साठी करायचं आणि म्हणायचं माझा स्वच्छ चेहरा आहे. राबणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय? ते प्रामाणिक होते का? तुम्हाला कार्यकर्त्यांनी एकवेळा आमदार आणि दोन वेळा खासदार केलं. कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं. कार्यकर्त्यांचं योगदान होतं की नाही, म्हणून जनतेनं त्यांना थर्ड क्लास दाखवला”, असा हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर केला.

“रविकांत तुपकर यांच्यासारखा कार्यकर्ता अडीच लाख मतदान घेतो. मात्र, स्वत:ला शेतकऱ्यांचा नेता म्हणून घेणाऱ्या नेत्याचं निवडणुकीत डिपॉझिट जप्त होतं. त्यामुळे यातच सर्वकाही आलं. एका बाजूला आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची काही ताकद नाही आम्ही चिल्लर आहोत. पण आम्ही काय आहे हे हातकणंगले मतदारसंघातील जनतेनं दाखवून दिलं”, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rayat kranti sanghatana leader sadabhau khot criticized to raju shetti in hatkanagale loksabha constituency gkt