नांदेड: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि पक्षाच्या अन्य प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मंगळवारी येथे झालेल्या तीन जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत लातूर जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी चांगली छाप पाडली तर बैठकीच्या शेवटच्या सत्रात नांदेड जिल्ह्यातील पक्षसंघटनेला लागलेली ‘धाप’ ठळक झाली. अनेक तालुकाध्यक्षांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. जिल्हा पदाधिकार्‍यांकडून पक्षाला उपदेश नव्हे, तर काम हवे असल्याचे प्रदेशाध्यक्षांनी बैठकीच्या शेवटी स्पष्ट केले.

जिल्ह्यातील नायगाव (बा.) येथे दिवंगत बळवंतराव आणि वसंतराव चव्हाण या नेत्यांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेला स्मृती सोहळा आटोपेपर्यंत सायंकाळ झाली होती, तरी प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी नांदेड येथील नियोजित आढावा बैठक नायगावहून येथे आल्यानंतर सुरू केली. माजी मंत्री आ.अमित देशमुख बराचवेळ उपस्थित राहिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी काळातील निवडणुकांच्या सज्जतेसंदर्भात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या आढावा बैठकीची सुरुवात लातूर जिल्ह्यापासून सुरू झाली. येथील ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळुंखे आणि इतर पदाधिकार्‍यांनी लातूर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. आ.अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आगामी निवडणुका लढण्यासाठी सर्व पदाधिकारी सज्ज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हिंगोली जिल्ह्यासाठी नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती झाली असून त्यांनी व तालुकाध्यक्षांनी जिल्ह्यातील एकंदर परिस्थितीची बैठकीत माहिती दिली.

काँग्रेस पक्षाने नांदेड महानगरासाठी महानगराध्यक्ष आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत. नांदेड जिल्ह्याचा आढावा सुरू झाल्यानंतर शहरातील कार्यकर्त्यांमध्ये असलेला बेबनाव स्पष्ट झाला. महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी अन्य पक्षांसोबत आघाडी नको, अशी भूमिका मांडली. तर बालाजी चव्हाण यांनी महानगर पक्षसंघटनेतील  एकंदर कारभारावर बोट ठेवताना शहरात बूथ समित्या पूर्ण नसल्याचा आरोप केला.

पक्षाने नांदेड उत्तर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी अलीकडे राजेश पावडे यांची नियुक्ती केली. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सद्यस्थितीचा अहवाल सादर केला. हदगावचे तालुकाध्यक्ष किशोर कदम यांनी माजी आमदार माधवराव जवळगावकर हे पक्ष सोडून जाणार नाहीत, असा खुलासा केल्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी त्यात हस्तक्षेप केला. तुम्ही स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता नाही, तालुकाध्यक्ष म्हणून काय करत आहात याची माहिती द्या, असे त्यांना सांगण्यात आले. हिमायतनगरचे तालुकाध्यक्ष या बैठकीस हजर नव्हते.

नांदेड दक्षिण जिल्ह्यातील देगलूर, बिलोली, धर्माबाद, उमरी इत्यादी तालुक्यांचे अध्यक्ष बैठकीला हजर नव्हते. त्यावर प्रदेशाध्यक्षांनी नाराजी व्यक्त केली. तत्पूर्वी दक्षिण विभागाचा आढावा सुरू होताच जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर उभे राहिल्यानंतर उपस्थितांतून तालुकाध्यक्षांना बोलण्याची संधी द्या, अशी मागणी झाली. त्यानंतर संजय भोसीकर यांनी कंधार तालुक्यातील  पक्ष कार्याची माहिती सादर केली. लोह्याच्या तालुकाध्यक्षांना नीट बोलताच आले नाही. लातूर जिल्ह्यातील संघटनात्मक कामाच्या तुलनेत नांदेड जिल्ह्यातील पक्षसंघटना कमकूवत असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.

नांदेड दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पक्षाची परिस्थिती खराब आहे, काम करण्यासाठी बळ राहिले नसल्याचे सांगून पक्षाने रसद पुरवली तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल, असे निदान केले. पण ही बाब प्रदेशाध्यक्षांना रूचली नसल्याचे स्पष्ट झाले. बैठकीचा समारोप करताना जिल्ह्याच्या पदाधिकार्‍यांनी आम्हाला उपदेश करू नयेत, अशा शब्दांत सपकाळ यांनी सर्वांना तंबी दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी प्रत्येक तालुक्यांतून बूथ समित्या पूर्ण करा, असा आदेश त्यांनी दिला.