कर्जत : दीर्घकाळच्या लढ्यानंतर कर्जत आगारात १० एसटी बस आज, गुरुवारी दाखल झाल्या. त्यामुळे कर्जतकरांचे गेल्या ५० वर्षांपासून प्रलंबित असलेले स्वप्न अखेर साकार झाले. कर्जतला एसटी महामंडळाचे आगार उभारण्याची दीर्घकाळापासून मागणी होती. त्यासाठी लढे, आंदोलने करण्यात आली. अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे.

कर्जत बसस्थानकावर १० एसटी बसचे आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या नावाची घोषणाबाजी करत आनंद व्यक्त केला. या एसटी बसचालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला. पक्षाचे पदाधिकारी रघुनाथ काळदाते, दीपक यादव, भूषण ढेरे, सुरेश पठाडे, मनोज गायकवाड, नामदेव थोरात, दादासाहेब धांडे, नवनाथ धांडे, सुधीर यादव, माजी प्राचार्य प्रताप भैलुमे, वाहतूक नियंत्रक श्री. लटपटे व श्री. चौधरी आदी उपस्थित होते.

या वेळी रघुनाथ काळदाते म्हणाले, ‘आमदार रोहित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच कर्जतला एसटी आगाराची उभारणी शक्य झाली. मात्र त्यांना श्रेय मिळू नये म्हणून काहींनी अडथळे आणले. आंदोलनानंतर एसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहा एसटी बस कर्जतकरांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. या दहापैकी श्रीगोंदा आगाराकडून ७ व जामखेड आगाराकडून ३ बस मिळाल्या आहेत.’

या वेळी दीपक यादव यांनी कर्जतहून चौंडी तीर्थक्षेत्राकडे जाण्यासाठी दोन बस सुरू करण्याची मागणी केली. या वेळी माजी प्राचार्य प्रताप भैलुमे यांनी आगारासाठी दिवंगत नेते आबासाहेब निंबाळकर, बापूसाहेब देशमुख, माजी आमदार विठ्ठलराव भैलुमे आदींनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण केले. कर्जत आगाराची पहिली बस दिवंगत नेते माजी मंत्री निंबाळकर यांच्या दिघी गावाकडे रवाना होत आहे, ही आनंदाची गोष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

कर्जत आगाराच्या निर्मितीसाठी तसेच ते उभारण्यासाठी, उभारणी झाल्यानंतर ते सुरू होण्यासाठी कर्जतकरांनी वेळोवेळी आंदोलने केली. हा प्रश्न दीर्घकाळ श्रेयवादामध्ये अडकला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आंदोलन केल्यानंतर एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रकांनी दहा एसटी बस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार या बस आज प्राप्त झाल्या.