सांगली : माझा एक दोष आहे, समोरून जोपर्यंत विरोध होत नाही, तोपर्यंत मी शांत असतो. ज्यावेळी विरोध सुरू होतो, त्यावेळी माझ्यातील मूळ माणूस कार्यप्रवण होतो, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी ज्येष्ठ नेते अण्णा डांगे यांच्या भाजप प्रवेशानंतर व्यक्त केली.
आमदार पाटील यांनी बुधवारी सायंकाळी आयर्विन नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री डांगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काय वाटते, असे विचारले असता, आमदार पाटील म्हणाले, जे फुटणार आहेत, ते फुटतच राहतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाबरोबर ज्यांना थांबायचे आहे ते थांबतील, यावर मी काय बोलणार? मुख्यमंत्री मंत्र्यांची पाठराखण करत आहेत, सरकारमधील कोणताही मंत्री काहीही बोलू दे, काहीही करू दे, मुख्यमंत्र्यांना ते मान्य असते, असेच सध्या दिसत आहे. यामुळे कृषी मंत्री कोकाटेंसह इतरांच्या केवळ राजीनाम्याचा विषय नाही, तर सरकार जनतेसमोर कसे हवे, हे मुख्यमंत्र्यांनी जातीने पाहायला हवे, असे आपणास वाटते.
राज्यातील पाच लाख ठेकेदारांची सुमारे ९० हजार कोटींची देयके थकली आहेत. ठेकेदारांवर शासनाची दहशत आहे. हर्षल पाटील याने आत्महत्या देयके रखडल्यानेच केली हे स्पष्ट आहे. केवळ तांत्रिक कारण पुढे करून सरकार वेळ मारून नेत आहे. आयर्विन पुलाला समांतर पूल उभारणीचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू झाले. काम पूर्ण होण्यास विलंब झाला असला तरी येत्या पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होवून सांगलीकरांसाठी पूल खुला होईल, असेही त्यांनी सांगितले.