शिवसेनेचे बंडखोर आमदार राज्यामध्ये परत येऊन आपआपल्या मतदारसंघामध्ये परतले आहेत. एकनाथ शिंदे यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुंबईमध्ये आपआपल्या मतदारसंघामध्ये गेलेल्या बंडखोर आमदारांचं त्यांच्या समर्थकांकडून जोरदार स्वागत केलं जात आहे. यवतमाळमधील दिग्रस मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोडही आपल्या मतदारसंघामध्ये परतले असून त्यांनी या बंडखोरीसंदर्भात एक मोठा खुलासा केला आहे. २१ जून रोजी शिंदे आणि काही निवडक आमदार बंड करुन सुरतला गेल्यानंतर मातोश्रीवर काय चर्चा झाली होती यासंदर्भात खुलासा करताना बंड मोडून काढण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरेंना पाठवण्यास तयार झालेले असं सांगतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे विचार बदलण्यात आल्याचा दावा राठोड यांनी केलाय.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना समजावण्यामध्ये आम्हाला यश आलं होतं. मात्र संजय राऊतांमुळे नियोजन फिस्कटल्याचा दावा राठोड यांनी केलाय. “मी, गुलाबराव, दादा भुसे उद्धव ठाकरेंना राजी करण्याचा प्रयत्न करत होते. ते राजीही झाले होते. आदित्य ठाकरेंना सुरतला पाठवतो असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यावेळी आम्ही त्यांना ते सर्व (बंडखोर) परत येईल याची गॅरंटी आम्ही घेतो असं सांगितलं होतं,” असं मातोश्रीवर झालेल्या चर्चेसंदर्भात राठोड यांनी टीव्ही ९ शी बोलताना सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी ही योजना कशी फसली आणि त्यानंतर आदित्य यांच्याऐवजी मिलिंद नार्वेकर आणि रविंद्र फाटक यांना पाठवण्यात आल्यासंदर्भातही खुलासा केला.

नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”

“एकनाथ शिंदेंशी दुष्मनी होती की काय कळेना, पण संजय राऊत फारच विरोधात बोलू लागले. त्यानंतर नार्वेकर आणि फाटक यांना पाठवण्यात आलं. ते तिकडे निघाले नाही तर इथं त्यांचा (शिंदेंचा) पुतळा जाळण्यात आला. विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आता तुम्हीच सांगा कसं होईल?” असा प्रश्न राठोड यांनी त्यावेळेच्या परिस्थितीसंदर्भात बोलताना पत्रकारांनाच विचारला.

नक्की पाहा >> Video: “वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी खर्च करतो, तुम्ही फक्त…”; अपघातग्रस्तांसाठी मुख्यमंत्री शिंदेंचा फोन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही ४० आमदारांनी घेतलेली भूमिका बंड नव्हे तर उठाव होता. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने आमच्यासाठी उघडले तर आम्ही सर्वजण परत जाऊ, असंही राठोड यांनी म्हटलं आहे. पक्षातील उठावानंतर सर्वांचाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘मातोश्री’वर परत येण्याचा विचार सुरू असताना, काही व्यक्तींच्या अनावश्यक बडबडीमुळे ते शक्य झाले नाही, असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay rathod says uddhav thackeray was ready to send aditya to convince eknath shinde but sanjay raut opposed scsg
First published on: 07-07-2022 at 13:51 IST