Sanjay Raut on Chhagan Bhujbal left Shivsena : शिवसेना पक्षाने आतापर्यंत अनेकदा फुटीच्या घटना पाहिल्या आहेत. आधी छगन भुजबळ, मग नारायण राणे आणि पाठोपाठ राज ठाकरे यांच्या जाण्याने शिवसेनेचं मोठं नुकसान झालं. दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत एकनाथ शिंदेंमुळे उभी फूट पडली. मात्र शिवसेनेतील पहिल्या फुटीच्या वेळी म्हणजेच छगन भुबळांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला तेव्हा पक्षांतर्गत काय घडत होतं याबाबत वेगवेगळे दावे प्रतिदावे केले जातात. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार व ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी याबाबत थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारले होते. त्यावर बाळासाहेबांनी काय प्रतिक्रिया दिली होती यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. मित्रम्हणे या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी काही जुने किस्से सांगितले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संजय राऊत म्हणाले, “मी लोकप्रभेत काम करत असताना एकदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. ती खूप ताकदीची मुलाखत होती. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य असलो, त्यांचं माझ्यावर प्रेम असलं तरी ती मुलाखत व्यावसायिकच होती. आमचे जिव्हाळ्याचे संबंध त्या मुलाखतीत कुठेही येऊ दिले नाहीत. त्या मुलाखतीच्या वेळी मी बाळासाहेबांना लोकांच्या मनातले काही प्रश्न विचारले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे माझ्यावर प्रचंड संतापले. त्यांनी माझा कान उपटून हातात द्यायचं बाकी राहिलं होतं. त्यानंतर त्यांना वाटलं की आता हे कार्टं (मी) आपल्याकडे पाहिजे, नाहीतर हे वाया जाईल.”

राऊत म्हणाले, “बाळासाहेबांनी कायम माझ्या हिंमतीला ताकद दिली. संपादक म्हणून काम करत असताना मला कधी रोखलं नाही. परंतु, कधी कधी त्यांना वाटायचं माझ्यातील आग कमी झाली आहे. तेव्हा ते मला म्हणायचे, तू विझलास, मग मी अजून जोमाने काम करायचो.”

बाळासाहेबांनी दिलेल्या शिव्या मी मुलाखतीत छापल्या : राऊत

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, “छगन भुजबळ फुटले, शिवसेना सोडून गेले त्याबाबत मी बाळासाहेब ठाकरे यांना प्रश्न विचारले होते. मी त्यांना विचारलं होतं की तुमच्या कार्यपद्धतीमुळे छगन भुजबळ फुटले असं वाटतं का? तुमचं काहीतरी चुकलंय असं तुम्हाला वाटत नाही का? समाजात शिवसेनेची गुंड ही प्रतिमा तयार झाली आहे आणि तुम्ही त्या प्रतिमेला खतपाणी घालताय का? असे काही प्रश्न मी बाळासाहेबांना विचारले. त्या प्रश्नांवर उत्तर देताना बाळासाहेबांनी मला अक्षरशः चोपलं आणि मी ते ‘लोकप्रभे’त छापलं. त्यानंतर ते मला म्हणाले, मी तुला घातलेल्या शिव्या तू छापल्यास, याला फार हिंमत लागते. तू त्या शिव्या मुलाखतीतून काढल्या नाहीस. त्यांनी केलेल्या या कौतुकातच माझं मोठेपण आलं. लोकांना ती मुलाखत आवडली.

हे ही वाचा >> Raj Thackeray Sanjay Raut : “राज ठाकरेंबरोबर वेगळं वृत्तपत्र सुरू करणार होतो, नावही ठरलं, पण…”, संजय राऊतांनी सांगितला जुना किस्सा

राऊत म्हणाले, त्या मुलाखतीच्या आधी बाळासाहेब मला म्हणाले होते, तू आता त्यांचा झाला आहेस, तू भांडवलदारांचा आहेस, मी त्यांना म्हटलं होतं, मला एकदा मुलाखत देऊन बघा, मग तुम्हाला कळेल मी त्यांचा झालोय की लोकांचा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut asked bal thackeray is chhagan bhujbal left shivsena because of your working style asc