Sanjay Raut meeting with Chandrakant Patil at Assembly : भाजपा आणि शिवसेनेची तीन दशकांपासूनची युती दोन वर्षांपूर्वी तुटली होती. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाजपाशी मुख्यमंत्रिपदावरून मतभेद झाल्यानंतर त्यांनी युती तोडली. तसेच त्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. मात्र हे सरकार केवळ अडीच वर्षे टिकलं. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून वेगळा गट तयार केला. या गटाच्या पाठिंब्यावर भाजपाने जून २०२२ मध्ये राज्यात महायुतीचं सरकार स्थापन केलं. आता भाजपा सत्तेत आहे तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडीबरोबर विरोधी बाकावर आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपात टोकाचा संघर्ष चालू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेनेचा शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाला आपल्याबरोबर घेतलं होतं. तरी देखील महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. महायुती महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे दावे करत होती. मात्र त्यांना अवघ्या १६ जागा जिंकता आल्या. तर महाविकास आघाडीने ३१ जागा जिंकल्या. तेव्हापासून भाजपाला पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची उणीव भासू लागली आहे. भाजपाची मातृसंस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपातील अनेक नेत्यांनी अजित पवार गटाचा निवडणुकीत महायुतीला फारसा फायदा झाला नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तसेच एकनाथ शिंदेंच्या पक्षाला केवळ सात जागा जिंकता आल्या होत्या. त्यामुळे भाजपा पुन्हा एकदा ठाकरे गटाला साद घालू शकते, असे अंदाज वर्तवले जात आहेत.

विधीमंडळ परिसरात संजय राऊत व चंद्रकांत पाटलांची भेट

दरम्यान, आज (१२ जुलै) विधीमंडळाच्या आवारात पुन्हा एकदा ठाकरे गटातील आणि भाजपामधील नेत्यांमधला जिव्हाळा पाहायला मिळाला. आज विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी विधानसभा आणि विधान परिषदेतील जवळपास सर्वच आमदार विधीमंडळ परिसरात उपस्थित होते. तसेच सर्व मोठ्या पक्षांचे वरिष्ठ नेतेही विधीमंडळात दाखल झाले होते. अशातच विधीमंडळाच्या पायऱ्यांवर एक अनपेक्षित घटना पाहायला मिळाली. शिवसेनेच्या ठाकरे गटातील राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एकमेकांची गळाभेट घेतली, तसेच दोन्ही नेते हास्यविनोद करताना दिसले.

हे ही वाचा >> MLC Election : “विधान परिषदेच्या निवडणुकीत आमची चार मतं फुटणार”, काँग्रेस आमदाराच्या वक्तव्याने खळबळ; रोख कोणाकडे?

दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली?

चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना हाक मारल्यानंतर संजय राऊत त्यांच्याकडे पाहून म्हणाले, “अरे वाह! आपण तर परत एकत्र यायलाच पाहिजे”. यावर पाटील म्हणाले, “हे तुमचं वक्तव्य असेल तर त्याची हेडलाईन होईल”. पाटलांची प्रतिक्रिया ऐकून राऊत म्हणाले “मी नेहमी हेडलाईनच देतो. माझी हेडलाईन कधी चुकत नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut meets chandrakant patil said we shivsena bjp should join hands asc