लोकसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आले नाही तर आम्हाला ४८ जागा स्वबळावर लढवाव्या लागतील. त्याही ताकदीनं लढवल्या पाहिजेत, असं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, “प्रकाश आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारे नातू आहेत. ‘देशात संविधान टिकावं, लोकशाहीची हत्या होऊ नये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हुकूमशाही लोकशाही मार्गानं संपावी,’ असं प्रकाश आंबेडकरांचं मत आहे. प्रकाश आंबेडकरांशी सकारात्मक चर्चा होत आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते लवकर एकत्र चर्चेसाठी बसणार आहोत.”

“प्रकाश आंबेडकरांची हुकूमशाहीविरोधात भूमिका अत्यंत स्पष्ट आहे”

“हुकूमशाहीचे हात बळकट होतील, असं कोणताच निर्णय प्रकाश आंबेडकर घेणार नाहीत. शिवसेनेच्या बरोबरीनं प्रकाश आंबेडकर पंतप्रधान मोदींच्या हुकूमशाहीवर हल्ले करत आहेत. प्रकाश आंबेडकरांची हुकूमशाहीविरोधात भूमिका अत्यंत स्पष्ट आहे,” असं संजय राऊतांनी म्हटलं.

“काँग्रेस आणि शरद पवारांचा प्रकाश आंबेडकरांना विरोध नाही”

“वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेची युती याआधीच झाली आहे. ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत प्रकाश आंबेडकरांबाबत उद्धव ठाकरेंनी मुद्दा मांडला होता. सोनिया गांधी आणि राहुल गांधींना वंचितला ‘इंडिया’ आघाडीत घेणं महत्वाचं असल्याचं पटवून दिलं आहे. काँग्रेस आणि शरद पवारांचा प्रकाश आंबेडकरांना विरोध नाही. प्रकाश आंबेडकरांची ताकद महाविकास आघाडी आणि ‘इंडिया’ आघाडीबरोबर असावी, याबाबत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं एकमत आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.