Sanjay Raut on Milind Deora’s Letter to Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले होते. पाच दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यानंतर जरांगे यांनी त्यांचं उपोषण मागे घेतलं. जरांगे यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक लाखोंच्या संख्येने मुंबईत दाखल झाले होते. हे आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने शहरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यावरून शिवसेनेचे (शिंदे) राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून “इथून पुढे आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी बंदी घालावी”, अशी मागणी केली आहे.

मिलिंद देवरा यांच्या या पत्रावर शिवसेनेचे (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “मिलिंद देवरा यांनी घेतलेल्या भूमिकेविषयी त्यांच्या नेत्यांचं (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) म्हणणं काय आहे हे मराठी माणसाला जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही मराठी माणसाला मुंबईत येऊ नका म्हणताय? आम्ही मराठी माणसं मुंबईत आंदोलन करू, नाहीतर हैदोस घालू, आम्हाला विचारणारे तुम्ही कोण? बाकी न्यायालयाचा त्यावर आक्षेप असेल तर आम्ही व न्यायालय ते बघून घेऊ. मुंबईत आंदोलनाला येत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आम्हाला रोखलं नाही आणि तुम्ही आम्हाला अडवताय?”

दक्षिण मुंबईचा ७/१२ तुमच्या नावावर केलाय का? संजय राऊतांचा प्रश्न

शिवसेना (उबाठा) खासदार म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी मुंबईत येणाऱ्या आंदोलकांना अडवलं नाही, अत्यंत संयमाने व समजुतदारपणे त्यांनी आंदोलकांना येऊ दिलं. ही मुंबई आमची आहे. तुम्ही कोण सांगणारे? देवरांच्या पक्षाचे नेते यावर काय म्हणतात ते मराठी माणसाला पाहायचं आहे. शिंदेंचे खासदार देवरा म्हणतायत मराठी माणसाने मुंबईत येऊ नये. दक्षिण मुंबईचा ७/१२ या धनिकांच्या नावावर लिहून दिला आहे का?”

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्या माणसाला आंदोलन काय असतं हे कसं माहिती असेल : आव्हाड

दरम्यान, मिलिंद देवरा यांच्या पत्रावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. आव्हाड म्हणाले, “मिलिंद देवरा यांचा जन्म ज्या घरात झाला आहे त्या घरात कचरा साफ करण्यासाठी, पाणी देण्यासाठी आणि इतर सगळी कामं करण्यासाठी २४ तास नोकरचाकर आहेत. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या या माणसाला आंदोलन काय असतं हे कसं माहिती असेल. त्यांच्या वडिलांनी वगैरे केलं असेल. परंतु, मिलिंद देवरांचं जीवनमान म्हणजे त्यांच्या भाषेत लाइफस्टाइल पाहता त्या लाइफस्टाइलला सुसंगत असं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं आहे.”