Sanjay Raut on MNS Shivsena UBT Alliance : गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना (ठाकरे) व मनसे या दोन पक्षांची युती होणार असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, या दोन्ही पक्षांचे प्रमुख परदेश दौऱ्यावर गेल्यामुळे ही चर्चा थांबली होती. आता हे दोन्ही नेते मुंबईत परतले असून पुन्हा एकदा युतीच्या चर्चेने जोर धरला आहे. यावर शिवसेना (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी म्हटलं आहे की “शिवसेना (उबाठा) पक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर युती करण्यासाठी सकारात्मक आहे. आम्ही राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यावर राज ठाकरेंनी निर्णय घ्यावा”. दरम्यान, “शिवसेनेने योग्य तो प्रस्ताव पाठवावा, आम्ही देखील युतीसाठी सकारात्मक आहोत”, अशी प्रतिक्रिया मनसेने दिली आहे.

मनसेने दिलेल्या प्रतिक्रियेवर आता शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणाले, “शिवसेना (ठाकरे) व मनसेमधील युती ही प्रस्तावाच्या चक्रात अडकणार नाही. तुम्ही प्रस्ताव द्या आम्ही मान्य करतो या असल्या प्रस्तावाच्या खेळात ही युती होऊ देणार नाही असं कोणाला वाटत असेल तर तसं काही होणार नाही. मनसेने याआधी ज्या पक्षांबरोबर युती केली होती त्यावेळी त्यांनी असे प्रस्ताव घेतल्याचं आमच्या नजरेत आलेलं नाही”.

मनसेच्या भावनेचा आदर केला पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलंय : संजय राऊत

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “राज ठाकरे यांनी युतीची भूमिका मांडली आहे. त्यांनी शिवसेनेबरोबर (ठाकरे) युतीची इच्छा व्यक्त केली आहे. त्यावर आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे आता हे प्रस्ताव वगैरे विषय चर्चेत येत नाहीत. सध्या दोन प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा व्हायला पाहिजे. राज ठाकरे यांनी खूप महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील त्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आम्हाला स्पष्ट सूचना केली आहे की युतीबाबत समोरून भावना व्यक्त केली गेली आहे. आपणही त्या भावनेचा आदर केला पाहिजे”.

युतीबाबत उद्धव ठाकरेंचा विचार भव्य : राऊत

राऊत म्हणाले, राज ठाकरे यांच्या पक्षाने एक भूमिका मांडली आहे आणि आपण या क्षणी कुठल्याही प्रकारची नकारात्मकता न दाखवता भूमिका घ्यायला हवी, असं उद्धव ठाकरे यांनी आम्हाला सांगितलं आहे. आपण त्याकडे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या, मुंबईच्या हितासाठी उचलेलं पाऊल म्हणून पाहणं गरजेचं आहे. असा भव्य विचार उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे आणि तो योग्य आहे असं आम्हा सर्वांना वाटतं. त्यामुळे यात कुठेही प्रस्ताव, ठराव येत नाहीत.

राज व उद्धव ठाकरेंमध्ये थेट चर्चा होण्याची शक्यता

दरम्यान, यावेळी राऊत यांना विचारण्यात आलं की तुम्ही व शिवसेनेचे (ठाकरे) इतर नेते म्हणत आहेत की दोन प्रमुख नेते निर्णय घेतील. परंतु, हे सगळं कधी सुरू होणार? यावर राऊत म्हणाले, “लवकरच सुरू होईल. सुरुवात कोणाकडूनही होईल. ते दोघे भाऊ आणि मोठे राजकीय नेते आहेत. ते दोघे थेट चर्चा करतील. त्याबद्दल आम्ही योग्य वेळी कल्पना देऊ”.