Sanjay Raut on Narendra Modi Waves Summit 2025 Mumbai : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मोदी मुंबईतील वेव्ज परिषदेत सहभागी झाले होते, तसेच त्यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतली होती. यावरून राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “देशावर दहशतवादी हल्ला झालेला असताना शत्रूविरोधात प्रत्येक कारवाईत आम्ही सरकारबरोबर आहोत. मात्र, कारवाई करण्याऐवजी पंतप्रधान प्रचार करतायत, सिनेकलाकारांबरोबरच्या कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.”

संजय राऊत म्हणाले, “आम्ही केंद्र सरकारबरोबरच आहोत. पण, तुम्ही युद्ध तरी सुरू करा. हे सरकार काय करतंय? सरकार केवळ राजकारण करतंय. आम्ही सरकारबरोबर आहोत. पण हल्ल्यानंतर २४ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचाराला गेले. अशा पंतप्रधानाचं समर्थन करायचं का? काल (१ मे) ते मुंबईत आले होते. नऊ ते दहा तास ते सिनेकलाकारांमध्ये रमले. तिथे त्यांनी प्रवचनही दिली. शाहरुख खान, आमिर खान आणि इतर नट-नट्यांमध्ये रमले. त्यांनी मोदींसाठी टाळ्या वाजवल्या. अशा नेत्याचं समर्थन करायचं का?”

“तर ते उडाणटप्पू लोकांच्या टपोरीपणाचं समर्थन ठरेल.”

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला देत म्हणाले, “अशा गोष्टी करत बसण्यापेक्षा दिल्लीत बसून पाकिस्तानवरील कारवाईबाबत योजना आखा, धोरण तयार करा. परंतु, मोदी भारतीय लष्करावर सगळी जबाबदारी टाकून मोकळे झाले आहेत. त्यांनी इंदिरा गांधींचं उदाहरण पाहावं. इंदिरा गांधींनी केवळ सैन्यावर जबाबदारी टाकली नव्हती. त्यांनी थेट आदेश दिला होता. मला युद्ध करायचं आहे असं त्या स्पष्ट म्हणाल्या होत्या. याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती. तशी इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का? या अशा सरकारचं समर्थन करायचं म्हणजे कमजोरी दाखवणं होय. अशा सरकारचं समर्थन म्हणजे उडाणटप्पू लोकांच्या टपोरीपणाचं समर्थन ठरेल.”

मोदींनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “देश इतक्या मोठ्या संकटात असताना मोदींच्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही दिसत नाही. काल ते मुंबईत बॉलिवूडच्या कार्यक्रमाला आले होते, तेव्हाचा त्यांचा चेहरा बघा. एखाद्या पंतप्रधानाने कालचा कार्यक्रम रद्द केला असता. बिहारचा प्रचाराचा दौरा रद्द केला असता. पण हे मात्र मस्तमौला, हरफनमौलासारखे मस्तपैकी फिरत आहेत. यावर आम्ही काय बोलणार. अशा सरकारचं समर्थन ज्याला करायचं आहे त्याने करावं. मात्र, ते जनतेच्या भावनेशी खेळत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. देशात दहशतवादी हल्ले होत आहेत आणि त्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जबाबदार असतील तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यावा.”