राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याची घोषणा केली आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसमधूनही शरद पवारांना निर्णय मागे घेण्यासाठी विनवणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे शरद पवारांनी निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी कार्यकर्त्यांकडे २ ते ३ दिवसांचा वेळ मागितला असताना दुसरीकडे त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीविषयी अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. अध्यक्षपदी नसताना शरद पवार कोणत्या प्रकारे पक्षात सक्रीय राहतील किंवा घडामोडींवर नियंत्रण ठेवतील? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात आज संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांना शरद पवारांच्या या निर्णयासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी राजकीय संन्यास घेतला नसल्याचं संजय राऊत म्हणाले. “शरद पवारांनी राजकीय संन्यास घेतलेला नाही. मी त्यांना ओळखतो. राजकारणात फार कमी लोकांना वाटतं की आपण इतरांसाठी जागा मोकळी करून दिली पाहिजे. पण तरी शरद पवार देशाच्या राजकारणात काम करत राहतील. विरोधी पक्षाचं नेतृत्व करत राहतील. भाजपा दिल्ली आणि महाराष्ट्रातून सत्तेतून नेस्तनाबूत होत नाही, तोपर्यंत ते काम करत राहतील”, असं संजय राऊत म्हणाले.
“शरद पवारांनी राजीनामा दिला, पण…”
“काल त्यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे संकेत दिलेले नाहीत. ते घेणारही नाहीत. शरद पवारांसारखे नेते समाजकारणाचे, राजकारणाचे श्वास आहेत. तो असा दूर करता येणार नाही”, असंही संजय राऊत म्हणाले.
VIDEO: “शरद पवारांचा राजीनामा हा मास्टर स्ट्रोक, कारण…”, मनसेचे आमदार राजू पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले…
“शरद पवारांची अस्वस्थता जाणवत होती”
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आपल्याला शरद पवारांची अस्वस्थता जाणवत होती, असं सूचक विधान यावेळी संजय राऊतांनी केलं आहे. शरद पवारांच्या निर्णयाबाबत माहिती होती का? अशी विचारणा केली असता संजय राऊतांनी हे विधान केलं. “शरद पवारांच्या मनातली अस्वस्थता गेल्या काही दिवसांपासून जाणवत होती. ते म्हणाले होते की भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. पण आता त्यांनी भाकरीच नाही, तर पूर्ण तवाच फिरवला आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
आत्मचरित्रातील मुद्द्यांना उद्धव ठाकरे उत्तर देणार!
दरम्यान, शरद पवारांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंविषयी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रामध्ये केलेल्या दाव्यांवरही संजय राऊतांनी भूमिका मांडली. “आत्मचरित्रात अनेक गोष्टी येत असतात. व्यक्तिगत भूमिका येतात. त्या लोकांच्या भूमिका नसतात. लवकरच या सगळ्या घडामोडींवर सामनातून उद्धव ठाकरेंची मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या सर्व शंकांवर त्यात उत्तरं मिळतील”, असं संजय राऊत म्हणाले.
