राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर स्वतः अजित पवारांनी या चर्चा फेटाळल्या. यावेळी त्यांनी इतर पक्षाचे नेते आणि त्यांची मुखपत्रे असा उल्लेख करत अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत आणि सामनावर टीका केली. तसेच त्यांना माझ्यावर बोलण्याचा अधिकार काय असं विचारलं. यानंतर अजित पवारांबाबतच्या बातम्या संजय राऊतांनीच पसरवल्याचाही आरोप होतोय. त्यावर बुधवारी (१९ एप्रिल) भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अजित पवार भाजपाबरोबर जाण्याच्या बातम्या पसरवण्यात संजय राऊतांची भूमिका आहे का?” या प्रश्नावर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “सुरुवात तर संजय राऊतांनीच केली. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत शरद पवारांना जाऊन भेटले. त्यानंतर या बातम्यांना पेव फुटला. त्यामुळे अजित पवारांनी स्पष्ट केलं की, सुरुवात कुणी केली. त्यामुळे संजय राऊत शरद पवारांचं ऐकतात की आणखी कुणाचं ऐकतात याबद्दल मला काही बोलायचं नाही.”

“दोन वर्षांपासून अजित पवारांचं प्रतिमाहनन”

“मागील दोन वर्षांपासून अजित पवारांचं प्रतिमाहनन करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. याला दुसरे कुणी जबाबदार नाहीत. महाविकासआघाडीतूनच असे प्रयत्न सुरू असतील,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

“अजित पवारांच्या नेतृत्वावर वारंवार कोण प्रश्न उपस्थित करत आहे हे त्यांनीच…”

पक्षफुटीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन केल्याचं बोललं जात आहे. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मी कालही स्पष्ट केलं आहे की, भाजपाकडे असा कोणताही प्रस्ताव नाही. अजित पवारांच्या नेतृत्वावर वारंवार कोण प्रश्न उपस्थित करत आहे हे त्यांनीच तपासलं पाहिजे.”

“भाजपा अजित पवारांच्या संपर्कात नाही”

“आमच्याकडून अशी कोणतीही चर्चा नाही. मी अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागेल किंवा जी गोष्ट घडलीच नाही त्याविषयी मी चुकीची माहिती सांगणार नाही. कुणीच अशी चुकीची माहिती देऊ नये. अजित पवारांनी भाजपाशी कोणताही संपर्क केलेला नाही. भाजपाही त्यांच्या संपर्कात नाही. कपोलकल्पित बातम्या तयार होत आहेत. अजित पवारांचे विरोधक या बातम्या तयार करत असतील,” असा आरोप बावनकुळेंनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut spread fake news about ajit pawar allege chandrashekhar bawankule pbs