“अडीच वर्षांनंतरही देवेंद्र फडणवीस तेच सकाळचे स्वप्न पाहत आहेत. अजूनही ते झोपेतून उठले नाहीत. शपथविधी सोहळा होतोय, ते मुख्यमंत्री आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत, असे स्वप्न कधीपर्यंत पाहणार? हे दळण आणखी किती काळ दळत राहणार?”, अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीवरुन केलेल्या दाव्यावर टीका केली. काल टीव्ही ९ या वृत्तवाहिनीवर बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नाव घेऊन टीका केली होती. अजित पवार यांच्यासोबतचा शपथविधी शरद पवार यांच्या परवानगीनेच झाला असल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. त्यावर आज माध्यमांशी बोलत असताना संजय राऊत यांनी याबाबत मोठं विधान केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवारांनी ते कांड केलं असतं तर..

“अडीच-तीन वर्ष झाली आता त्या शपथविधीला. शरद पवार यांचा त्यात काहीही संबंध नाही. शरद पवारांनी ते कांड केले असते तर सरकार पाच वर्ष टिकले असते. त्यावेळी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा एकही आमदार भाजपाला फोडता आला नाही. भाजपाने सर्वात आधी शिवसेनेशी विश्वासघात केला. त्यावेळी शरद पवार जर तुमच्या षडयंत्रात सामील असते, तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या सरकारने पाच वर्ष पूर्ण केले असते. शरद पवार आपल्या शब्दांचे पक्के असून ते हाती घेतलेले काम पूर्ण करतात”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबीला मांडीवर का घेतले?

“असं काही ठरलं नव्हतं, हे बोलण्याची हिंमत करु नका. असंच ठरलं होतं. हे तुमच्या तोंडून निघालेलं होतं. हॉटेल ब्लू सी मधील तुमचं वक्तव्य तुम्हीच तपासून पाहा. हे एक नंबरचे खोटारडे लोक आहेत. त्यांचा खोटारडेपणा आम्ही रोज उघड करु. जर असं काही ठरलं नव्हतं. तर मग उद्धव ठाकरेंना दिलेला वायदा मिंधे गटाच्या टेस्ट ट्यूब बेबी सोबत का पूर्ण करत आहात. त्यांना का मांडीवर बसवून त्यांचा पाळणा हलवत आहात. आता म्हणत आहात, आम्ही शिवसेनेशी युती केली, मग आम्ही कोण होतो?.”, असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

आम्ही फडणवीसांना कशाला अटक करु?

तसेच फडणवीस यांनी त्यांना अटक करण्याचे कारस्थान रचले जात असल्याचाही आरोप केला होता. या आरोपाला प्रत्युत्तर देत असताना राऊत म्हणाले, “आमचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणणे ही महाविकास आघाडीची परंपरा नाही. मात्र त्यांनी असे काय केले, ज्यामुळे त्यांना अटक होण्याची भीती सतावत होती. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांनी मविआच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे यांचा फोन टॅप करुन ते सर्व ऐकत होते. हा गंभीर गुन्हा आहे. मविआ सरकार या प्रकरणाचा तपास करत होती. मात्र तेवढ्यात सरकार बदलले. फडणवीस सत्तेत आल्यानंतर आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास तुम्ही का होऊ दिला नाही. तुम्ही पाप केलंय, म्हणूनच तुम्ही घाबरत आहात.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut statement on devendra fadnavis allegation taking sharad pawar name kvg