शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लक्ष्य केलं आहे. महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर संजय राऊतांनी फोटोसह सलग तीन ट्वीट केले आहेत. त्यावर लिहित संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कॅसिनोत जुगार खेळत आहेत. फोटो झूम करुन पहा… ते तेच आहेत ना? पिक्चर अभी बाकी है…”

“खेळले तर बिघडले कोठे?”

“१९ नोव्हेंबर… मध्यरात्री… मुक्काम : मकाऊ, वेनेशाईन… साधारण ३.५० कोटी कॅसिनो जुगारात उडवले, असं प्रत्यक्षदर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत… खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?” असा खोचक सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

“झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय”

“ते म्हणे.. कुटुंबासह मकाऊ ला गेले आहेत… जाऊ द्या. त्यांच्याबरोबर बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!,” असा इशाराही संजय राऊतांनी दिला आहे.

“…तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे”

यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नाना पटोले म्हणाले, “महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती आहे. दुसरीकडे, भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचा फोटो समोर आला आहे. या फोटोचा तपास केला पाहिजे. याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष कॅसिनोत जुगार खेळत असतील, तर ही महाराष्ट्रासाठी गंभीर बाब आहे.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut tweet chadrashekhar bawankule macau casino photos allegation 3 crore ssa