गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी औरंगजेबाचं पोस्टर किंवा व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्यावरून वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यासंदर्भात संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी काही ठिकाणी आंदोलन, मोर्चेही काढण्यात आले. यासंदर्भात औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, यादरम्यान ठाकरे गटाच्या प्रवक्त्यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. यासंदर्भात खुद्द संजय राऊत यांनी माहिती दिली असून देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं झालं काय?

ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यानुसार, इंडिया टीव्हीवर एका चर्चासत्रात ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे सहभागी झाले होते. मात्र, या चर्चासत्रानंतर त्यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. “चर्चासत्र चालू असतानाच मला फोन आला. पण मी तो उचलला नाही. नंतर फोन केला असता सगळ्यात आधी मला समोरून विचारण्यात आलं की तू काय स्वत:ला छत्रपतींचा वंशज समजतोस का? टीव्हीवर पुढेपुढे करून बोलतोयस. त्यानंतर मला शिवीगाळ करत गोळी घालून जीवे मारण्याची धमकी दिली”, असा दावा आनंद दुबेंनी केल्याचं इंडिया टीव्हीच्या वृत्तात नमूद केलं आहे.

शिंदे गटाच्या सचिवांनीच दिली धमकी?

दरम्यान, ही धमकी शिंदे गटाचे सचिव संजय माशेलकर यांनी दिल्याचा दावा आनंद दुबे यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वीच संजय माशेलकर शिंदे गटात दाखल झाले आहेत. या प्रकाराबाबत मुंबईच्या समतानगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही आनंद दुबे यांनी सांगितलं आहे.

“मी उपस्थित केलेली शंका खरी ठरली, पीडित तरुणीला…”, मुंबईतील बलात्कार-हत्या प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया

संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीस यांना सवाल!

ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी यासंदर्भात ट्वीट करून राज्य सरकारचा निषेध केला आहे. “महाराष्ट्रात हे काय चाललंय? खोके सरकारने ही काय परिस्थिती करून ठेवली आहे? शिवसेना प्रवक्ते आनंद दुबे काल एका न्यूज चॅनलवर चर्चा करत होते, तेव्हा त्यांना ऑन एअर धमकावण्यात आलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मूकदर्शक बनून बसले आहेत. तुम्ही काय राजकीय विरोधकांची हत्या करण्याची सुपारी दिली आहे का? हत्येचंही टेंडर काढलं आहे का? देवेंद्र फडणवीस, उत्तर द्या. इथे तर औरंगजेबाचं सरकार चालू आहे”, असं संजय राऊतांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून आता पुन्हा एकदा शिंदे गट, भाजपा आणि महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut tweet targets devendra fadnavis on anand dubey threat pmw