Sanjay Shirsat Viral Video : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांच्याबद्दल गंभीर दावे केले आहेत. “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत”, असा दावा राऊत यांनी केला आहे. यासह राऊत यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत. या व्हिडीओमध्ये बेडशेजारी एक बॅग देखील दिसत आहे. या बॅगेत नोटांची बंडलं आहेत. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे.

शिरसाट यांच्या बाजूला पैशांनी भरलेल्या बॅगा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आयकर विभागाच्या नोटिशीनंतर शिरसाटांचा हा व्हिडीओ माझ्याकडे आला आहे, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. “मंत्री संजय शिरसाट एका हॉटेलमधील खोलीत बेडवर बसले आहेत आणि त्यांच्या बाजूला नोटांच्या बंडलांनी भरलेल्या बॅगा दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिरसाटांवर कारवाई करणार का?” असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केला आहे.

संजय शिरसाटांचं स्पष्टीकरण

दरम्यान, कथित पैशाच्या बॅगेबाबत संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला यावर त्यांनी टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, “तो व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवास करून आल्यानंतर बेडवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. बेडशेजारी आमचा श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची अडकवलेली बॅग दिसतेय, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटतंय.”

शिरसाट एवढ्यावरच थांबले नाहीत. ते म्हणाले, माझ्याकडे मातोश्री व मातोश्री २ नाही. माझं घर माझ्या मतदारसंघातील प्रत्येकासाठी उघडं असतं. कार्यकर्ते येतात, उत्साहाच्या भरात कोणीतरी व्हिडिओ काढला असेल. माझ्या घरात चिठ्ठी देऊन कोणालाही बोलावलं जात नाही. काम काय, नाव काय, अशा गोष्टी विचारल्या जात नाहीत.”

व्हिडीओ खूप काही सांगून जातो : राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासह त्यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला टॅग करत देशात काय चाललंय असा प्रश्न विचारला आहे. राऊतांनी म्हटलं आहे की “हा रोमांचक व्हिडीओ पंतप्रधान मोदी व अमित शाह यांनी पाहायला हवा. देशात काय चाललंय हे त्यांनी पाहावं. महाराष्ट्रातील एका मंत्र्यांचा हा व्हिडीओ खूप काही सांगून जातो. हा व्हिडीओ पाहून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दया येते. स्वतःच्या अब्रूचे किती धिंडवडे ते फक्त पाहात बसणार आहेत? हतबलतेचे दुसरे नाव फडणवीस!”