Sanjay Shirsat Meets Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाची मागणी घेऊन मुंबईत उपोषण केल्यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर स्वीकारलं असून त्यानुसार कुणबी नोंदी असलेल्या कुटुंबांना आता प्रमाणपत्र दिली जाणार आहेत. राज्य सरकारने यासंबंधीचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यावर काही ओबीसी नेत्यांनी व आंदोलकांनी आक्षेप घेतला आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या शासन निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं सांगितलं. तर, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचं म्हणणं आहे की “या शासन निर्णयाद्वारे सरकारने ओबीसी आरक्षणाच्या नरडीचा घोट घेतला आहे.” मात्र, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी या निर्णयावर कुठलाही आक्षेप घेतला नाही. या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आहे.
मराठवाड्याला काही मिळूच नये अशी काहींची भावना : शिरसाट
दरम्यान, या सगळ्यावर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. “मराठवाड्याला काही मिळूच नये अशी काहींची भावना आहे”, अशा शब्दांत शिवसेनेचे (शिंदे) नेते तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही काही कोणाच्या ताटातलं घेत नाही, या ताटातलं त्या ताटात करत नाही”, अशी टिप्पणी देखील त्यांनी यावेळी केली.
संजय शिरसाटांनी घेतली मनोज जरांगेंची भेट
संजय शिरसाट यांनी गुरुवारी (४ सप्टेंबर) संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
“आम्ही या ताटातलं त्या ताटात करत नाही”
जरांगे यांच्याशी चर्चा केल्यानंतर शिरसाट म्हणाले, “सरकारने जारी केलेल्या शासन निर्णयाचा सर्वात जास्त फायदा हा मराठवाड्याला होणार आहे. परंतु, मराठवाड्याला काही मिळूच नये अशी काही लोकांची भावना आहे. परंतु, असं चित्र नसावं. आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही काही कोणाच्या ताटातलं घेतलं नाही. या ताटातलं त्या ताटात करत नाही. जे आहे ते देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. यावर आम्ही सध्या जास्त काही बोलत नाही.”