सातारा : जानेवारी महिन्यापासून दरांमध्ये सातत्याने होत असणाऱ्या घसरणीमुळे उत्पादन खर्च तर दूर, तोडणीची मजुरीही निघत नसल्याने हवालदिल झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो तोडणीच थांबवली आहे. त्यामुळे शेतातच टोमॅटो गळून पडत आहेत. सध्याच्या पावसाने त्यामुळे शेतातच टोमॅटोचा लाल चिखल झाला आहे.
मागील वर्षी टोमॅटोला मिळालेल्या चांगल्या भावामुळे यंदा मोठ्या आशेने टोमॅटोची लागवड केली. मात्र यावेळी मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. वाई तालुक्यात अनेक गावांत व ओझर्डे परिसरातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी वाई, सातारा, पुणे आणि वाशी येथील बाजार समित्यांमध्ये पाठवतात. मात्र, सध्या सर्वच बाजारपेठांमध्ये टोमॅटोची आवक वाढल्याने दरांमध्ये मोठी घसरण झाली आहे.
सध्या टोमॅटोला प्रतिकिलो अवघा सात ते आठ रुपये, म्हणजेच प्रति कॅरेट दीडशे ते दोनशे रुपये इतका कमी दर मिळत आहे. या तुटपुंज्या दरातून वाहतूक, मजुरी, आडत आणि हमालीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक चक्रात अडकला आहे.
गेल्या वर्षी टोमॅटोला चांगला भाव मिळाल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात लागवड केली. एका एकरासाठी रोपे, मल्चिंग पेपर, खते, औषध फवारणी आणि मजुरी असा मिळून सुमारे दीड लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याच्या दरात हा खर्च निघणेही अशक्य झाल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. विक्री करणे परवडत नसल्याने अनेकांच्या शेतातील टोमॅटो झाडांवरच लाल होऊन गळून पडत आहे. त्यामुळे पावसात या टोमॅटोचा शेतातच चिखल होत आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे आणि निराशेचे वातावरण आहे.
मागील वर्षी जून, जुलै, ऑगस्ट महिन्यात टोमॅटोचे दर वाढले होते. टोमॅटोची राखण करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे लागले. त्यावेळी शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा झाला. मात्र, यंदा जानेवारी महिन्यापासून अद्याप टोमॅटोला चांगला दर मिळाला नाही. त्यामुळे टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे. – मिलिंद खरात, शेतकरी.