सातारा : महाबळेश्वर येथील वेण्णा लेकमध्ये बोटीतून खोलवर भटकण्यास गेल्यावर भरकटलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात आली. या कामी खुद्द महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी कर्मचाऱ्यांसह स्वतः बोट चालवून शोध घेत या पर्यटकांना वाचवले.

दिवाळीच्या सुट्ट्या आणि जोडून आलेला शनिवार रविवार यामुळे महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे. महाबळेश्वरचे नागरिक, व्यावसायिक पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. या सगळ्यांचे मुख्य आकर्षण हे वेण्णा लेकवर पर्यटकांची मोठी गर्दी आहे.

त्याच उत्साहात आज काही पर्यटक स्पीड बोट घेऊन वेण्णा लेक मध्ये मौज मजा करण्यास गेले होते. यावेळी ते तलावांमध्ये फिरत खूप आतील बाजूस गेले आणि जंगली भागात ते भरकटले. आजूबाजूला सर्वत्र जंगल बाजू दिसू लागल्याने या पर्यटकांना आपण मार्ग चुकल्याचे लक्षात आले
आणि घाबरलेल्या या पर्यटकांनी तातडीने नियंत्रण कक्षाकडे मदत मागितली.

महाबळेश्वर पालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यावेळी याच परिसरात होते. त्यांनी स्वतः बचाव पथकासह बोटीतून हरवलेल्या पर्यटकांचा शोध घेतला. अखेर खूप वेळच्या शोधानंतर त्यांना भरकटलेली बोट सापडली. त्यांनी बोट योग्य दिशेस आणून पर्यटकांना तलावाच्या काठावर आणले.

बोट योग्य दिशेला येत सुटका होताच पर्यटकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काठावर पोहोचताच या पर्यटकांनी मुख्याधिकारी योगेश पाटील व सहकारी कर्मचाऱ्यांचे आभार मानले..

दीपावली सणानिमित्त महाबळेश्वरला देशभरातून पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. महाबळेश्वर मध्ये वेण्णा बोट क्लबला पर्यटक आवर्जून भेट देत असतात. पर्यटक नौका विहाराचा आनंद घेत असताना दोन पर्यटकांच्या बोटी हवेचा प्रवाह बदलल्यामुळे भरकटली असण्याची शक्यता व्यक्त की जात आहे. पर्यटकांनी वेण्णा तलावातील ठरलेले क्षेत्र सोडून दूरवर जाऊ नये असे आवाहन मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी केले.