सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या ‘ऑरेंज अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून उद्या, बुधवार, २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.

​जिल्ह्यात सध्या अतिवृष्टीची परिस्थिती असून, अनेक नद्या, नाले आणि धरणे धोका पातळीच्या जवळ वाहत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून वाहतूकही ठप्प झाली होती. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

​दरम्यान, आज सकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली होती. मात्र, काही शाळा सुरू झाल्या असल्यामुळे पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दुपारच्या सत्रात लवकर सुट्टी देण्यात आली. तसेच, उद्या संपूर्ण दिवस शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बंद राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या पत्रकातून स्पष्ट केले आहे.