नांदेड : मोठ्या वलयांकित राजकीय घराण्यातील एक कन्या गेल्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात विधानसभेवर निवडून आली. आमदारपदाची शपथ घेऊन राजकीय आणि विधायक कार्यात सहभागी झाली. तिचा (म्हणजे श्रीजया चव्हाण) आमदारकीनंतरचा वाढदिवस येत्या २६ मे रोजी असून याच दिवशी भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेडमध्ये येत आहेत. या निमित्ताने काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि काही पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्ह्यातील भोकर मतदारसंघाच्या लोकप्रतिनिधींची परंपरा हैदराबाद राज्याचे पहिले गृहमंत्री दिगंबरराव यांच्यापासून सुरू होते. पण या मतदारसंघाला राज्यभर ओळख दिली, ती शंकरराव चव्हाण यांनी. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक आणि स्नूषा अमिता चव्हाण यांनीही या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केल्यानंतर या दाम्पत्याने आजोबांचा पारंपरिक मतदारसंघ त्यांच्या लाडक्या नातीकडे सोपविला आहे.
२००९ साली भोकर मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर तेथे चव्हाण परिवाराचा झेंडा फडकत आहे; पण पहिल्या तीन निवडणुकांत तेथे काँग्रेसची सरशी झाली तर श्रीजया चव्हाणांच्या माध्यमातून तेथे भाजपाचे ‘कमळ’ प्रथमच फुलले. १९६२ पासूनच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस विचारधारेतील उमेदवाराला कौल देणाऱ्या या मतदारसंघाने ६२ वर्षांनंतर नव्या-दुसऱ्या पक्षाला साथ दिली. नांदेडजवळच्या परभणी जिल्ह्याच्या मेघना बोर्डीकर यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले, पण चव्हाण परिवारातील श्रीजया यांना संधी मिळाली नाही.
भाषावार प्रांतरचनेनंतरच्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण थेट उपमंत्री झाले. पुढे १९९३ साली अशोक चव्हाण यांना आमदारकीच्या पहिल्या कारकिर्दीतच राज्यमंत्रिपदी संधी मिळाली. श्रीजयाच्या बाबतीत मात्र तसे घडले नसले, तरी दोन वर्षांनंतर तिला मंत्रिमंडळात स्थान मिळावे, असा अशोक चव्हाण यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने ते भाजपामध्ये सक्रिय झाले असून गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजित दौऱ्याची सारी सूत्रे चव्हाण व त्यांचे समर्थक सांभाळत आहेत.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या नांदेड दौऱ्याची २६ मे ही तारीख आणि आमदार श्रीजयांचा वाढदिवस हा केवळ योगायोग आहे का, किंवा वाढदिवसाचे निमित्त साधत चव्हाण यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे वरील तारीख मागितली, ते कळाले नाही. पण शंकरराव चव्हाण स्मृतिस्थळास गृहमंत्र्यांची भेट आणि भाजपाच्या बैठकीसाठी ‘भक्ती लॉन्स’ हे स्थळ टाळून ती आपल्या शिक्षण संस्थेच्या परिसरातील कुसुम सभागृहात आयोजित करणे, हा काही योगायोग नाही.
अशोक चव्हाण यांनी वरील वास्तूचे उद्घाटन आणि शंकरराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्ष सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या उपस्थितीत केले होते. आता भाजपाचा एक राष्ट्रीय नेता प्रथमच चव्हाणांच्या शिक्षण संस्थेच्या परिसरात येत असून काँग्रेसचे दोन माजी आमदार आणि काही प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश होण्याची शक्यता आहे.