काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भारत जोडो यात्रेत पोलिसांनी खासदार राहुल गांधी यांना भेटण्यासाठी आलेल्या मुली आणि महिलांना ढकलायचे आणि धक्काबुक्की केली, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच महाराष्ट्रात पोलिसांचा उपयोग करण्यात आला. त्याचा व्हिडीओ आम्ही सेव्ह केला आहे. उद्या आमचे दिवस येतील आणि त्यावेळी यावर काय करायचं ते बघू, असा थेट इशारा पटोलेंनी दिला. ते मंगळवारी (२२ नोव्हेंबर) बुलढाण्यात बोलत होते.

नाना पटोले म्हणाले, “केंद्रातील मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील ‘ईडी’ सरकार अत्याचारी आहे. अत्याचारी सरकारच्या प्रशासनातील अधिकारी वर्गही अत्याचारी व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी झाले आहेत. राहुल गांधींना भेटायला येणाऱ्या मुला-मुलींना, महिलांना पोलीस ढकलायचे आणि धक्काबुक्की करत होते. हे सर्वांनी पाहिलं.”

“पोलीस दलातही काही लोक अत्याचारी निघाले”

“असं असलं तरी पोलीस विभागाने आम्हाला जे सहकार्य केलं त्याविषयी आभारच मानले आहेत. मात्र, पोलीस दलातही काही लोक अत्याचारी निघाले आहेत,” असा आरोप नाना पटोलेंनी केला.

व्हिडीओ पाहा :

“मनसेला पोलिसांचं सहकार्य मिळाल्याचा व्हिडीओ पाहिला”

नाना पटोले पुढे म्हणाले, “जो पक्ष महाराष्ट्रात नाहीच त्याची माध्यमांमध्ये चर्चा आहे. मात्र, मी जे व्हिडीओ पाहिले त्यात मनसेला पोलिसांचं सहकार्य कसं मिळालं हे दिसत आहे. तसा आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आला असला पाहिजे. त्याचंच पालन पोलीस करत असताना आपण पाहिलं.”

“प्रशासनाचा दुरुपयोग करण्यात आला”

“केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ईडी सरकारच्या पायाखालील वाळू सरकण्यास सुरुवात झाली. त्यानंतर प्रशासनाचा दुरुपयोग करण्यात आला. हे त्यांच्यासाठी मोठं काम नाही. जसा केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग केला जातो, तसाच महाराष्ट्रात पोलिसांचा उपयोग करण्यात आला. हे आता सिद्ध झालं आहे,” असं मत नाना पटोलेंनी व्यक्त केलं.

हेही वाचा : कोश्यारी, भाजपाला नाना पटोलेंचा जाहीर इशारा, म्हणाले, “माफी मागा अन्यथा…”

“तो व्हिडीओ आम्ही सेव्ह केला, उद्या आमचेही दिवस येतील”

“तो व्हिडीओ आम्ही सेव्ह केला आहे. आज त्यांचे दिवस आहेत, उद्या आमचेही दिवस येतील. त्यावेळी यावर काय करायचं ते बघू,” असा थेट इशाराही पटोलेंनी दिला.