Ujjwal Nikam : वकील उज्ज्वल निकम यांची आज (१३ जुलै) राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. उज्ज्वल निकम यांच्यासह शिक्षणतज्ज्ञ सी सदानंदन मास्ते, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि शिक्षणतज्ज्ञ मीनाक्षी जैन यांची देखील राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोट्यातून ही नियुक्ती करण्यात आलेली आहे. वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांच्या राज्यसभेवर नियुक्ती दरम्यानचा एक किस्सा सांगितला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्यांना या नियुक्तीबाबत फोन आला होता, तेव्हा नेमकं काय घडलं? हा किस्सा निकम यांनी सांगितला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी मराठी भाषेत संवाद साधल्याचंही निकम यांनी सांगितलं. या संदर्भातील माहिती उज्ज्वल निकम यांनी ट्विव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे.

वकील उज्ज्वल निकम यांनी काय सांगितलं?

“माझ्या आयुष्यातील हा आनंदाचा क्षण आहे. कारण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून माझी राज्यसभेवर नियुक्ती करणं हे माझ्या कुटुंबीयांसाठी अभिमानास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खूप उत्कृष्ट मराठी बोलतात. ते महाराष्ट्रात भाषण करताना मराठीत सुरुवात करतात आणि नंतर हिंदीत भाषण करतात”, असं उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.

“मला काल त्यांचा ८ वाजेच्या दरम्यान फोन आला आणि ते मला म्हणाले की उज्ज्वलजी मराठीत बोलू की हिंदीत बोलू? त्यानंतर मी हसलो, तर ते देखील हसले. मग ते म्हणाले की उज्ज्वलजी मी तुम्हाला फोन यासाठी केला आहे की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या तुमच्यावर काही महत्वाची जबाबदारी सोपवू इच्छित आहेत. तुम्ही ती जबाबदारी स्वीकाराल का? मग मी त्यांना सांगितलं की हो. पण कोणती जबाबदारी? ते म्हणाले की राज्यसभेची. पण ते असंही म्हणाले की, एवढं लक्षात ठेवा की ही गोष्ट कोणाला सांगू नका. पण मोदीजी माफ करा, मी लगेच माझ्या कुटुंबीयांना सांगितलं”, असं वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितलं.

‘राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी’ : उज्ज्वल निकम

“भाजपाने मला जेव्हा लोकसभेची उमेदवारी दिली होती, तेव्हा पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने माझ्यावर लोकसभेच्या निवडणुकीत जो विश्वास दाखवला होता तो विश्वास मी यावेळी सार्थ करून दाखवेन. अर्थात राष्ट्रपती नियुक्त सदस्य असल्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी असणार आहे. कायद्याचा अभ्यास आणि कायद्याचं विश्लेषण आणि या देशाच्या ऐक्यासाठी, देशातील लोकशाही आणि देशाचं संविधान कशा पद्धतीने प्रबळ राहील याची काळजी घेण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन”, असं उज्ज्वल निकम माध्यमांशी बोलताना म्हणाले.

“महाराष्ट्राच्या जनतेला मी आश्वासित करतो, कारण महाराष्ट्रातून माझ्या एकट्याचीच नियुक्ती राष्ट्रपतींनी केली आहे. त्यामुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे मी आभार व्यक्त करतो. मला कल्पना आहे की माझ्यावरील ही जबाबदारी मोठी असली तरी सर्वांचे आशीर्वाद मला मिळतील. मी अनेक दहशतवाद्यांचे खटले चालवले. २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा कट पाकिस्तानात रचला असा कुठेही पुरावा नसल्याचं पाकिस्तानने सांगितलं होतं. पण त्यांना उत्तर देताना आम्ही डेव्हिड हेडलीची साक्ष घेतली होती. डेव्हिड हेडलीची साक्ष घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे आम्ही त्यावेळी डेव्हिड हेडलीची साक्ष घेऊ शकलो”, असंही उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.