Shambhuraj Desai on Cabinet Expansion : शिवसेनेचे (शिंदे) नेते शंभूराज देसाई यांच्याकडे यापूर्वी उत्पादन शुल्क खातं होतं जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे (अजित पवार) गेलं आहे. महत्त्वाचं खातं न मिळाल्यामुळे शंभूराज देसाई नाराज आहेत अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट या खात्याचे माजी मंत्री व विद्यमान पर्यटन तथा खणीकर्म मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया विचारली असता देसाई म्हणाले, “हे खातं (पर्यटन) देखील त्याच तोलामोलाचं आहे. आमच्या शिवसेनेबाबत बोलाल तर आमच्या कोट्यातील उत्पादन शुल्क मंत्रिपद हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे गेले आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला ‘गृहनिर्माण’सारखं एक चांगलं खातं आम्हाला मिळालं आहे. मुंबईसह शहरी विभागातील लोकांचा प्रश्न, ग्रामीण भागातील लोकांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी या खात्यावर आहे. अत्यंत चांगलं काम करण्याची संधी या विभागामुळे शिवसेनेला आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाली आहे. गोरगरिबांना घर देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे. प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला त्याच्या हक्काचे घर मिळावे हे आपले स्वप्न आहे, जे गृहनिर्माण विभाग पूर्ण करणार आहे. हा विभाग उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आला आहे. एकनाथ शिंदे आता सर्वांचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शंभूराज देसाई म्हणाले, “माझ्याकडे आता पर्यटन, खणीकर्म व सैनिक कल्याण विभाग आला आहे. हे खातं देखील त्याच तोलामोलाचं आहे. मंत्रिमंडळातील हे महत्त्वाचं खातं आहे. महाराष्ट्रात पर्यटनामध्ये मोठी आर्थव्यवस्था निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे. आपण आता कोल्हापूरमध्ये उभे आहोत. पर्यटनाच्या बाबतीत कोल्हापूर विभाग असेल, कोकण विभाग असेल, आमच्या साताऱ्यात महाबळेश्वर असेल, कास पठार, कोयनानगर सह वाई आणि इतर परिसरांचा विकास आपल्याला करायचा आहे. राज्यातील पर्यटनस्थळांचा विकास करायचा आहे. जास्तीत जास्त पर्यटक आपल्या महाराष्ट्रात कसे येतील यावर लक्ष द्यायचं आहे”.

हे ही वाचा >> पालकमंत्रिपदांचं वाटप कधी होणार? मंत्री शंभूराज देसाईंनी डेडलाईनच संगितली

शंभूराज देसाई काय म्हणाले?

नवनिर्वाचित पर्यटन मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “जग आता पर्यटनाकडे वळत आहे. त्या माध्यमातून एक वेगळी अर्थव्यवस्था उभी करता येऊ शकते. त्यामुळे पर्यटन विभागाला गती देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. पर्यटन विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मी नागपूरवरून मुंबईला येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच आलो. त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की तुम्ही या विभागात चांगलं काम कराल. तसेच तुमच्या विभागाला पुरेसा निधी दिला जाईल. त्यामुळे आता मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना चांगलं काम करून दाखवेन”.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai reacts on ministry of state excise goes to ncp ajit pawar asc