Sharad Pawar Statement about Parth Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्याच्या कोरेगाव पार्क येथील शासनाचा ४० एकरांचा भूखंड विकत घेतल्याचे उघड झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. यानंतर आता शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्ते केली आहे. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य केले असून पार्थ पवार यांची बाजू त्यांनी सावरली आहे.
सुमारे १८०० कोटी रुपये इतके बाजारमूल्य असलेली महार वतनाची जमीन चुकीच्या पद्धतीने केवळ ३०० कोटींना विकत घेतली गेली. असा आरोप विरोधकांनी केला. दोन दिवसांपासून या प्रकरणात अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पार्थ पवारांचे मामेभाऊ आणि त्यांचे भागीदार असलेले दिग्विजय पाटील यांच्यासह काही जणांवर गुन्हा दाखल झाला.
पवार कुटुंब एकत्र येणार का?
सुप्रिया सुळे यांनी दोन दिवसांपूर्वी बोलत असताना पार्थ पवार यांच्याबाबत मवाळ भूमिका घेतली. तसेच त्यांनी काही चुकीचे केले असेल असे वाटत नाही, असे विधान केले. त्यावरून विविध चर्चांना पेव फुटले होते. आज शरद पवार यांनी अकोला येथे पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबद्दल प्रश्न विचारण्यात आले.
पवार कुटुंब आणि पक्ष हे राजकीयदृष्ट्या जवळ येत आहेत का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. “सध्याचे सगळे वातावरण पाहिल्यानंतर कुणी असा निकाल घेईल, असे वाटते?” असा प्रतिप्रश्न उपस्थित करत शरद पवारांनी या प्रश्नाचा निकाल लावला.
कुटुंब नाही तर विचारधारा महत्त्वाची
कुटुंब प्रमुख म्हणून या प्रकरणाकडे तुम्ही कसे पाहता? असे विचारले असता शरद पवार म्हणाले, “प्रशासन, राजकारण आणि कुटुंब याच्यात फरक आहे. कुटुंबप्रमुख म्हणून मला विचाराल तर आम्ही एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढलो. माझा एक नातू हा अजित पवारांच्या विरोधात उभा होता. अजित पवारांच्या पत्नी माझ्या मुलीच्या विरोधात उभ्या होत्या. राजकारणात आम्ही कुटुंब आणत नाही तर आमची विचारधारा आणतो.”
पार्थ पवार प्रकरणावर म्हणाले…
पार्थ पवार प्रकरणात राज्य सरकार त्यांना वाचवत आहे का? असा प्रश्न यावेळी पत्रकार परिषदेत विचारण्यात आला होता. यावर शरद पवार म्हणाले की, राज्य सरकारने यावर चौकशी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालातून कोणत्या बाबी समोर येतात, ते पाहिले पाहिजे. तसेच यानिमित्ताने अजित पवार यांना घेरण्याचा प्रयत्न झाला आहे का? असाही प्रश्न यावेळी विचारण्यात आला. त्यावर शरद पवार म्हणाले की, याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण हा गंभीर विषय असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. जर मुख्यमंत्रीच हा गंभीर विषय असल्याचे सांगत असतील तर त्यासंबंधी चौकशी करून त्याचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवले पाहिजे.
पार्थ पवारांवर गुन्हा का नाही?
अमेडिया एलएलपी कंपनीमध्ये पार्थ पवार यांची ९९ टक्के भागीदारी आहे. तर त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांची एक टक्के भागीदारी आहे, असे आरोप विरोधकांनी केले. तरीही पार्थ पवार यांना वगळून दिग्विजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, याचे उत्तर राज्याचे गृहमंत्री देऊ शकतात. तुम्ही आम्ही यावर उत्तर देऊ शकत नाहीत.
