Heavy Rain Updates in Marathwada: मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांत सध्या मोठ्या प्रमाणावर पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसत आहे. पूरपरिस्थितीमुळे घराघरांत पाणी तर शिरलंच आहे, पण त्याचबरोबर शेतीमध्ये पिकांसोबत मातीही वाहून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभं राहिलं आहे. राज्यात निर्माण झालेल्या या परिस्थितीवर शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांना मदत करणं ही केंद्र सरकार व राज्य सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे.

“सोयाबीन भरवश्याचं पीक, पण यावेळी…”

शरद पवारांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील पूरस्थितीबाबत सविस्तर भाष्य केलं. “दुष्काळासाठी प्रसिद्ध आणि जिथे पाऊस-पाण्याची कमतरता असते अशा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. त्याचा प्रचंड परिणाम शेतीवर, गुराढोरांवर आणि शेतकऱ्यांच्या संसारांवर झालेला आहे. साधारणपणे या महिन्यांमध्ये सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. सोयाबीन हे भरवश्याचं पीक असतं. मात्र, अतिवृष्टीमुळे सोयाबीनची वाढ झाल्यानंतर पाच दिवस वाफ्यामध्ये पाणी राहिलं आणि त्यामुळे सोयाबीनसह इतर पिकं कुजून गेली. त्यामुळे, त्यापासून येणारं उत्पादन शेतकऱ्यांच्या हातात पडलेलं नाही”, असं शरद पवारांनी सांगितलं.

केंद्राच्या योजनेचा लाभ घ्या – शरद पवार

दरम्यान, यावर शरद पवारांनी राज्य सरकारने केंद्राच्या योजनेतून शेतकऱ्यांसाठी मदत करावी, अशी विनंती केली आहे. “आपण दुष्काळ पाहिला. पण अशी अतिवृष्टी यापूर्वी कधी पाहिली नव्हती. नेहमी कमी पाऊस असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये अतिवृ्ष्टी होत आहे. त्यात सोलापूर, लातूर, धाराशिव, जालना, औरंगाबाद, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. अशा संकटाच्या वेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची जबाबदारी राज्य व केंद्र सरकारची असते. केंद्राकडे नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करण्याची योजना आहे. या योजनेचा लाभ घेऊन राज्य सरकारने वेगाने पंचनामे करणं व नुकसानभरपाई देणं या दोन गोष्टी तातडीने करणं आवश्यक आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“पीक वाहून गेलं तर त्या वर्षीचं नुकसान होतं. पण जमीन वाहून गेली, तर त्या जमिनीची उत्पादकता कायमची कमी होते. त्यामुळे फक्त पिकांसाठी मदत करून चालणार नाही, जमिनीसाठीही मदत करावी लागेल. रस्ते उद्ध्वस्त झाले आहेत, अनेक ठिकाणी गुरं वाहून गेली. त्यामुळे शेतीसाठी समस्या निर्माण होतील. या सर्व गोष्टींकडे बघण्याची गरज आहे. हे काम राज्य सरकारला गतीनं करावं लागेल”, असं शरद पवारांनी नमूद केलं.