ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामधील राजकारण चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना संजय राऊतांनी शिंदे सरकार कधी पडणार, याविषयी केलेलं भाकित चर्चेचा विषय ठरलं आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी हे भाकित केलं होतं. त्यासंदर्भात आता शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

आज पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊतांनी रावसाहेब दानवेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिंदे सरकारविषयी मोठं विधान केलं होतं. “सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामं करा”, असा सल्ला एका कार्यक्रमात बोलताना रावसाहेब दानवेंनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी शिंदे सरकार दोन महिन्यांत पडू शकतं, अशी शक्यता वर्तवली आहे.

“रावसाहेब दानवे कधीकधी खरं बोलून जातात. दोन महिन्यांत काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं. म्हणजे त्यांनी मध्यावधीचे संकेत दिले आहेत. हे सरकार १०० टक्के पडणार याविषयी मला पूर्ण खात्री आहे”, असं संजय राऊत म्हणाले.

“…मग मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय दिवे लावणार आहात?” सीमा प्रश्नावरून संजय राऊतांचे शिंदे सरकारवर टीकास्र

शितल म्हात्रेंचं खोचक ट्वीट!

दरम्यान, संजय राऊतांनी केलेल्या या वक्तव्यावर शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी टोला लगावला आहे. “राज्य सरकार दोन महिन्यांत पडेल – संजय राऊत. अहो, तुमचे आघाडी सरकार २५ वर्षं चालेल म्हणाला होतात. एका रात्रीत ते कसं कोसळलं माहीत आहे ना?” असा खोचक सवाल शितल म्हात्रे यांनी केला आहे.

त्यामुळे आता या मुद्द्यावरून दोन्ही बाजूंनी टीका-टिप्पणी सुरू झाली आहे.