Sanjay Gaikwad slap canteen staff: शिवसेनेचे (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासातील कँटिनमध्ये कर्मचाऱ्याला सर्वांसमोर बेदम मारहाण केली. निकृष्ट जेवण दिल्याचा आरोप करत आमदार गायकवाड यांनी मारहाण केल्याचे सांगितले. सदर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याचे पडसाद विधानपरिषदेतही उमटले. शिवसेनेचे (ठाकरे) नेते अनिल परब यांनी विधानपरिषदेत सदर मुद्दा उपस्थित करत संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला उत्तर दिले.

अनिल परब म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जनता सुसंस्कृत नेते म्हणून पाहते. अशा मुख्यमंत्र्यांच्या सरकारमधील एक माजलेला आमदार टॉवेल, बनियानवर कँटिनमध्ये येऊन कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग स्टाईलमध्ये मारत आहे.” सरकारचा आमदारांवर वचक आहे की नाही? असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाले म्हणून बनियान, टॉवेलवर जाऊन आमदाराने मारहाण करावी का? आमदाराने किमान काही संकेत पाळायला नको का? ही काय रस्त्यावरची, गल्लीतली माणसे आहेत का? तुमच्यात (आमदार) ताकद असेल तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारून दाखवा. त्या कर्मचाऱ्याचा काय गुन्हा होता?, असाही प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला.

अनिल परब पुढे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडे ज्यांच्यामुळे जात आहेत, त्यांचा तरी बंदोबस्त मुख्यमंत्र्यांनी करावा. अशा लोकांचा पाठिंबा मुख्यमंत्री घेणार का? असाही प्रश्न विचारत अनिल परब यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…

अनिल परब यांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमदार संजय गायकवाड यांचे वर्तन विधीमंडळ सदस्यास भूषवाह नाही. आमदार निवासात सोयी-सुविधा नसतील तर तक्रार करायला हवी होती. पण आमदारांनी मारहाण करणे चुकीचे आहे. तसेच विधीमंडळ अध्यक्ष आणि विधानपरिषदेच्या सभापतींनी याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.”

एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया…

आमदार संजय गायकवाड यांच्या मारहाणीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमदार निवासातील निकृष्ट जेवण खाल्ल्यानंतर त्यांना उलटी झाली. यामुळे त्यांनी रागातून सदर प्रकार केला. या मारहाणीचे आम्ही समर्थन करत नाहीत. लोकप्रतिनिधींनी मर्यादा पाळायला हव्यात. चूक झाली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, पण मारहाण करणे चुकीचे आहे.