Uddhav Thackeray and Raj Thackeray Alliance: शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन सोहळा आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाप्रणीत केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संभाव्य युती करण्याबाबतही भाष्य केलं. उद्धव ठाकरे भाषणात म्हणाले, “गेल्या काही दिवसांपासून बातम्या सुरू आहेत. काय होणार? होणार का? मी म्हणतो होणार की नाही होणार, ते लवकरच सर्वांना कळेल. तुमच्या (कार्यकर्ते) सर्वांच्या जे मनात आहे, राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करेन.” काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची हॉटेलमध्ये भेट झाली होती, याचाही संदर्भ देऊन त्यांनी भाजपाला लक्ष्य केलं.

“पण मराठी माणसाची युती होऊ नये, मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये. म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठीभेटी घ्यायला लागले आहेत. मुंबईवर जर यांना ताबा मिळाला नाही आणि मुंबई पुन्हा आमच्या ताब्यात आल्यानंतर यांच्या मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदाणीचं काय होणार? याचीच त्यांना चिंता सतावत आहे. यामुळे मराठी माणसाची शक्ती एकत्र न येऊ देण्याचे प्रयत्न सुरू आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त झालेली भाषणे खालील लिंकवर पाहा.

“शेठजींचे नोकर आणि नोकरांचे नोकर आज तिकडे वर्धापन दिन साजरा करत आहेत. युती होणारच नाही, होणारच नाही, असं ते म्हणत आहेत. पण तुम्हाला काय करायचं आहे? आमचं आम्ही बघून घेऊ. शिवसेना पक्षप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकू, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं नामोनिशाण आम्ही पुसून टाकू”, असंही प्रतिआव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं.

राजकारणात ज्यांना मुलं होत नाहीत, ते दुसऱ्यांची मुलं चोरतात

दरम्यान आपल्या संपूर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिवसेना (शिंदे) गटावर टीका केली. “राजकारणात ज्यांना मुलं होत नाहीत, अशी लोक आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. अशा लोकांची कीव येते. भारतीय जनता पक्ष असाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख असते तर आज त्यांच्यासाठी वेगळा शब्द वापरला असता. त्यांना आजवर कधी मुलं झाली नाहीत, त्यामुळं ते दुसऱ्यांची मुलं स्वीकारत आले”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.