Aaditya Thackeray On Sanjay Shirsat Viral Video : राज्याचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक विविध विषयांवरून आमने-सामने येत असल्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्री वेगवेगळ्या कारणांनी चांगलेच चर्चेत आले आहेत. आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

असं असतानाच आता मंत्री संजय शिरसाट यांचा पैशाच्या बॅगेबरोबरचा कथित व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ खासदार संजय राऊत यांनी एक्सवर (ट्विटर) शेअर केला आहे. या व्हिडीओनंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आमदार आदित्य ठाकरे यांनी संजय शिरसाटांवर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “५० खोके एकदम ओके’मधील एक खोका आज दिसला”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“३३ देशांमध्ये ज्या गद्दारीची नोंद घेतली गेली, ५० खोके एकदम ओके त्यातील कदाचित एक खोका आज दिसला असेल. या खोक्यात असंही दिसून येतं की तुम्ही अशा प्रकारचे खोके घेतल्यानंतर याच कंपनीची बनियन घालू शकता, हे त्यांनी दाखवलं आहे. आपण आज पाहत आहोत की हे व्हिडीओ सगळीकडे फिरत आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या एका आमदाराचा मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यानंतर आता एका मंत्र्यांचा पैशाच्या बॅगेबरोबरचा व्हिडीओ व्हायरल झाला. ते स्वत: मंत्री आहेत, त्यांच्यावर आरोप झाले की हॉटेल हडपण्याचा प्रयत्न, जमीन हडपण्याचा प्रयत्न झाला, यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी लावली आहे. पण प्रश्न हाच आहे की या आमदारांचे बॉस मिंदे हे त्यांच्यावर कारवाई करणार का?”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

https://x.com/rautsanjay61/status/1943602319989596317

“पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून शिरसाटांचा VIDEO शेअर

शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांच्याबद्दल गंभीर आरोप केले आहेत. “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत”, असा दावा राऊत यांनी केला आहे. यासह राऊत यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की मंत्री संजय शिरसाट एका खोलीमधील बेडवर फोनवर बोलत आहेत व सिगारेट ओढत आहेत. या व्हिडीओमध्ये बेडशेजारी एक बॅग देखील दिसत आहे. या बॅगेत नोटांची बंडलं आहेत. या व्हिडीओमध्ये संजय शिरसाट यांचा पाळीव श्वान देखील दिसत आहे.

संजय शिरसाट यांनी काय स्पष्टीकरण दिलं?

कथित पैशाच्या बॅगेबाबत संजय शिरसाट यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांच्या घरातील हा व्हिडिओ कोणी व्हायरल केला यावर त्यांनी टिप्पणी केली. ते म्हणाले, “तो व्हिडिओ माझ्या बेडरूममधीलच आहे. मी प्रवास करून आल्यानंतर बेडवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसतंय. बेडशेजारी आमचा श्वानही आहे. प्रवासातून आल्यानंतर माझी कपड्यांची अडकवलेली बॅग दिसतेय, त्याची बातमी होते, याचं मला आश्चर्य वाटतंय.”