‘’भाजपात जणू फडणवीस एकटेच चाणक्य उरले आहेत’’; भास्कर जाधवांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

भास्कर जाधव यांनी शिवसेना फोडण्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली

‘’भाजपात जणू फडणवीस एकटेच चाणक्य उरले आहेत’’; भास्कर जाधवांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
(संग्रहित छायाचित्र)

एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी न होता, उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेना फोडण्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘’भाजपात जणू आता एकटे फडणवीसच चाणक्य उरले आहेत’’, असे ते म्हणाले. तसेच सुशील मोदी यांच्या वक्तव्यानंतर भाजपाचा खरा विद्रुप चेहरा पुढे आला, असेही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले भास्कर जाधव?

‘’जेपी नड्डा यांनी प्रादेशिक पक्ष संपवण्याची भाषा केली, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे यांना मुख्यमंत्री करायचे नव्हते म्हटले. मात्र, त्यांना असं म्हणायचं नव्हतं, असं स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस देत आहे. जणू आता संपूर्ण देशात फडणवीस एकटचे भाजपाचे चाणक्य उरले आहेत, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे.

आरे कारडशेडवरुन फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले “फक्त आपल्या अहंकारासाठी…”

‘’भाजपाची विश्वासार्हता आता उरलेली नाही. भाजपा विरोधकांना नाही तर ज्या पक्षाशी मैत्री करतात त्यांना संपवतो. हा भाजपाचा इतिहास आहे, परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेसारखा २७ वर्ष जूना आणि प्रामाणिक तसेच भाजपाच्या प्रत्येक अडचणीत सोबत राहिलेला पक्षही त्यांनी फोडला आहे. ही बंडाळी झाल्यानंतर भाजपाचे नेते म्हणत होते, की त्याच्याशी आमचा काहीही संबंध नाही. मात्र, जे भाजपाच्या पोटात दडलं होतं ते काल सुशील मोदी यांच्या ओठावर आलं, त्यानिमित्तानं भाजपाचा विद्रुप चेहरा पुढे आला’’, असेही ते म्हणाले.

‘’जे आमदार शिवसेना सोडून गेले त्यांना आता कळून चुकले आहे की, त्यांना मदत करण्यासाठी भाजपाने शिवसेना फोडली नाही, तर भाजपाला सत्ता हवी होती म्हणून शिवसेना फोडण्यात आली. १०६ आमदार असताना आम्ही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं, बघा आम्ही किती मोठा त्याग केला, असं जे दाखवत होते. ती त्यांची खरी निती नाही. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवायचं आणि स्वत: सत्ता उपभोगायची एवढाच भाजपाचा डाव आहे’’, असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आरे कारडशेडवरुन फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले “फक्त आपल्या अहंकारासाठी…”
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी